दोन दिवस काही गाड्या रद्द
शनिवारी (दि. 17) आणि रविवारी (दि. 18) रोजी डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस या रद्द केल्या आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे – मध्य रेल्वेची पुणे ते मुंबई मार्गावरील दोन आठवडे ठप्प असणारी रेल्वे वाहतूक शुक्रवारी काही अंशी सुरू झाली. पण रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे दोन दिवस पुणे ते मुंबई मार्गावर इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एक दिवसाचा दिलासा मिळाला. तरी देखील आणखी दोन दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
घाट परिसरात कोसळलेली दरड आणि मुंबईतील पाऊस यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक गेले 15 दिवस ठप्प होती. लांब पल्ल्याच्या गाड्यांसह पुणे ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्या देखील या शुक्रवारपर्यंत (दि. 16) बंद ठेवण्यात आल्या होत्या. शुक्रवारी पुणे ते मुंबई मार्गावर केवळ इंद्रायणी, इंटरसिटी, सिंहगड आणि डेक्कन क्वीन या इंटरसिटी गाड्या धावल्या.
मात्र, घाट परिसरामध्ये सुरू असणाऱ्या कामामुळे शनिवारी आणि रविवारी रेल्वे वाहतूक बंद राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. यामुळे रेल्वे वाहतूक नक्की केव्हा सुरू होणार आणि प्रवाशांचे हाल केव्हा थांबणार असा सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे.