पुणे – ‘कोथरूड परिसरात बुधवारी गवा आढळल्याची घटना घडली. पण, पुण्यात यापूर्वीदेखील गवा आढळला आहे. साधारण 12 ते 13 वर्षांपूर्वी कात्रज भागात गवा आढळला होता. त्यावेळी वनविभागाने पकडून त्याला जंगलात सोडले होते,’ अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे संचालक सत्यजीत गुजर यांनी दिली.
शहरात गवा आढळल्यानंतर त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सामान्यत: जंगलात आढळणारा हा प्राणी शहरात कसा आला? याबाबत कुतुहल निर्माण झाले आहे. याबाबत पुण्यामध्ये दीर्घकाळ वनसेवेत राहिलेले आणि सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे संचालक असलेले सत्यजीत गुजर यांच्याशी “प्रभात’ने संपर्क साधला.
याविषयी गुजर म्हणाले,”पुणे शहरालगतच्या ताम्हिणी- सुधागड ते अगदी भोरपर्यंतच्या जंगल परिसरात गव्यांचे वास्तव्य बऱ्यापैकी आहे. पुढे महाबळेश्वर-सातारा-चांदोली-राधानगरी या “कॉरिडॉर’मार्गे पश्चिम घाटात गव्यांचे नियमित स्थलांतर होत असते. सामान्यपणे जंगलातील “कॉरिडॉर’मधून फिरणारा हा प्राणी लोकांच्या नजरेस पडत नाही. क्वचितच तो जंगलातून भरकटून बाहेर आल्याची नोंद आहे.
पुण्यात 12 ते 13 वर्षांपूर्वी कात्रज भागात गवा आढळला होता. त्यावेळी वनविभागाने त्याला जंगलात सोडले होते. नंतरच्या काळातही काही ठिकाणी गवा आढळला आहे, पण तो स्वत:हून निघून गेल्याने त्याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, पुणे शहर परिसरात गव्यांचे बऱ्यापैकी वास्तव्य असून, याठिकाणी गव्यांसाठी सुरक्षित “कॉरिडॉर’ आहे. हे वनविभागाच्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे. ‘