ओझर : अष्टविनायकापैकी असणाऱ्या तीर्थक्षेत्र ओझर या ठिकाणी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या लगतच असणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरच सांडपाणी साठत असल्याने बँकेत येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तीर्थक्षेत्र ओझर येथे मुख्य वेशी पासून मंदिराच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्याच्या लगतच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे.
येथे रस्त्याच्या पूर्वेकडील गटाराचे काम अपूर्ण अवस्थेत असून उत्तरेकडून येणारे सांडपाणी तसेच पावसाचे पाणी बँकेच्या समोरच साठत असल्याने ग्राहकांना तसेच स्थानिक व जेष्ठ नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे . पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ओझर शाखेत जाण्यासाठी खातेधारकांना कसरत करावी लागत आहे.
बँकेच्या कामासाठी आलेली एक महिला काही दिवसांपूर्वीच त्या पाण्याच्या डबक्यात पडली. सुदैवाने फारशी दुखापत झाली नाही. येथे साठलेल्या सांडपाण्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असून त्याचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ओझर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा संख्या मोठी आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन बंदिस्त गटाराचे काम लवकरात लवकर पूर्ण करून सांडपाणी आणि पावसाचे पाणी याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.