कॅन्टोन्मेंट शासनाने उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक आग्रही
पुणे – फॅशन स्ट्रीट येथे अनेक विक्रेत्यांनी बेकादेशीरपणे जागा बळकावल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमणांचा त्रास आसपासच्या गृहसोसायट्यांमधील स्थानिकांना बसत आहे. यासह अनेकांनी बेकायदेशीरपणे दुकाने देखील थाटली आहे. त्यामुळे बोर्ड प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत केल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, याबाबत विशेष सभा बोलवणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.
फॅशन स्ट्रीटच्या परिसरात अनेकांनी बेकायदेशीरपणे दुकाने देखील थाटली आहेत. यामुळे आवश्यक असणारी पायाभूत कामे करणे अडचणीचे होत आहे. याबाबत केवळ सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होते. बोर्ड प्रशासनाने 569 स्टॉलला परवानगी दिली आहे. परंतु, फॅशन स्ट्रीट येथे बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यांची संख्या 800 च्या घरात पोहोचली आहे. यासह मोलेदिना रोड, एम.जी. रस्त्यावरही अतिक्रमणे वाढली आहेत.
कारवाई केल्यानंतर पुन्हा काही वेळाने पथारीवाले त्याच ठिकाणी दुकाने थाटतात. त्यामुळे प्रत्यक्षात अनधिकृत स्टॉल्सधारकांवर दररोज कारवाई करणे आवश्यक आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या फॅशन स्ट्रीटच्या प्रश्नावर बोर्डाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. तर याबाबत तोडगा काढण्यासाठी बोर्डाने विशेष सभा घ्यावी आणि आराखडा तयार करण्याची मागणी बोर्डाचे उपाध्यक्ष विवेक यादव यांनी केली.
हा प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार गरजेचा आहे. त्यामुळे बोर्डाची विशेष सभा बोलवण्यात येणार आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी देखील स्थानिकांशी संवाद साधून प्रश्न सोडण्यासाठी पर्याय सुचवावे, असे बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर कुलजीत सिंह यांनी सांगितले.