फुरसुंगी-उरुळीदेवाची कचरा डेपोचा प्रश्‍न कायम धुमसताच

उपनगर वार्तापत्र : महादेव जाधव

फुरसुंगी – उरुळीदेवाची येथील शहराच्या कचरा डेपोचा प्रश्‍न धुमसताच आहे. मुळातच यावर प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचा आरोप होत आहे. धनकचरा हाताळणी नियम 2016चे उल्लंघन प्रकारासह महापालिका अधिकारी तसेच ठेकेदार यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याने याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी कचरा डेपो हटाव कृती समितीकडून करण्यात आली असताना याकामी दुर्लक्षच करण्यात आल्याचे उघड आहे.

फुरसुंगी-उरुळीच्याच माथी कचरा डेपो मारण्यापेक्षा पालिका प्रशासनाने इतर ठिकाणी सुध्दा प्रकल्प व डेपो सुरु करण्याची गरज आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक गणेश ढोरे यांनीही पालिकाआयुक्त व महापौरांना लेखी निवेदन दिले आहे. हा प्रश्‍न सातत्याने पालिका प्रशासनापुढे मांडला आहे. परंतु, पालिकेला फक्त फुरसुंकी आणि उरूळीदेवाची ही दोनच गावे कचरा डेपोसाठी दिसतात, अशीच काहीशी स्थिती आहे.

उरुळी-फुरसुंगी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत महापालिकेचे धोरण कायमच चुकीचे राहिलेले आहे. राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्णयानुसार उरुळी-फुरसुंगी कचराडेपोत कोणत्याही प्रकारचा कचरा प्रकल्प राबवू नये, असा आदेश आहे. याठिकाणी विविध प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2019ची अंतिम मुदत दिलेली होती. ही मुदत केंव्हाच उलटलेली आहे. त्यानंतरही याठिकाणी कचरा टाकला जातो, म्हणजेच काय तर कोणत्याच प्रशासनाचा यावर अंकुश नाही.

याउलट कचरा डेपोत होणारे ओपन डंपिंग फुरसुुंगी-उरूळीदेवाची कचरा डेपो हटाव संघर्ष समितीने वारंवार बंद पाडले. म्हणजे कचरा डेपेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असाच प्रश्‍न यातून उभा राहतो. फुरसुंगी-उरुळी कचरा डेपो विरोधात गेल्या कित्येक वर्षे नागरिकच आंदोलन करीत आहेत. त्यानंतरही अन्यत्र प्रकल्प सुरू करण्यापेक्षा याच गावातील नागरिकांच्या माथी कचरा प्रकल्प मारण्याचा प्रयत्न पालिकेतील सत्ताधारी करीत आहेत. परंतु, कचरा प्रकल्प राबवू द्यायचा नाही, असा ठाम निर्धार कचरा डेपो हटाव संघर्ष समितीने केला आहे.

शहरातील कचरा शहरातच जिरवा…
कचरा डेपोच्या नरकयातना येथील नगारिक गेली 27 वर्ष सोसत आहेत. आता कचरा डेपोच्या चारही दिशांनी नागरीकरण झाले आहे. त्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न आहे. पालिका प्रशासनाने शहरातील कचरा त्या-त्या प्रभागातच जिरवावा, प्लॅस्टिकबंदी काटेकोरपणे राबवावी. पालिका प्रशासनाने शहराच्या चारही दिशांना नविन जागा शोधून प्रकल्प राबवावेत, याठिकाणी इतर प्रकल्प रिजेक्‍ट कचरा आणून टाकू नये, ओपन डंपिंग कायमचे बंद करावे, फुरसुंगी-उरुळी देवाची कचराडेपोत कोणताही नविन प्रकल्प आणू नये अशा मागण्या सातत्याने नागरिकांकडून होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.