पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) दि. 9 व 10 जानेवारी रोजी होणार आहे. जूनमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय ऑनलाइन अधिसभेनंतर आता दोन दिवस प्रत्यक्ष अधिसभा होणार आहे. पहिल्यांदाच झालेल्या ऑनलाइन परीक्षा, त्यातील तांत्रिक त्रुटी हे मुद्दे यात गाजणार असल्याची चिन्हे आहेत.
जानेवारीमध्ये विद्यापीठाची अधिसभा घेण्यासाठी विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मान्यता घेण्यात आली. त्यासाठी विद्यापीठस्तरावर नियोजनही सुरू झाले आहे. वर्षातून दोनवेळा विद्यापीठाची अधिसभा घेतली जाते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अधिसभा झाली. त्यानंतर करोना व लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये आयोजित अर्थसंकल्पीय अधिसभा रद्द करावी लागली.
त्यानंतर जूनमध्ये ऑनलाइन पद्धतीने ही अधिसभा झाली. त्यानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष अधिसभा होणार आहे. यूजीसी व सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही माध्यमातून बहुपर्यायी पद्धतीने झालेल्या अंतिम वर्षांच्या परीक्षेतील गोंधळ गाजला होता. या पार्श्वभूमीवर येत्या अधिसभेत या परीक्षेतील तांत्रिक समस्या, निकालातील त्रुटी हे मुद्दे ऐरणीवर येणार असल्याची शक्यता आहे.