पिंपरी – कॅनरा बॅंकचे एटीएम जिलेटीनचा स्फोट घडवून आणत उडविले. यात एटीएम सेंटरचे नुकसान झाले असले तरी साडेपाच लाख रुपयांची रोकड सुरक्षित आहे. भरवस्तीत पहाटेच्यावेळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे. तसेच एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
त्रिवेणीनगर, तळवडे येथील अष्टविनायक कॉलनीमध्ये कॅनेरा बॅंकेचे एटीएम आहे. पहाटे दोन चोरट्यांनी जिलेटीन आणि डिटोनेटरच्या सहाय्याने एमटीएम सेंटरमध्ये स्फोट घडवून आणला. यामुळे एमटीएम सेंटरचा दरवाजा रस्त्यावर 40 फूट अंतरावरील रस्ता दुभाजकावर जाऊन आदळला. एटीएम मशीनचा दर्शनी भाग उडाला असला तरी आतील रोकड असलेला भाग उडाला नाही. त्यामुळे साडेपाच लाखांची रोकड सुरक्षित राहिली.
स्फोटापूर्वी चिखली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल यांनी एटीएम सेंटरला भेट दिल्याची नोंदही आहे. याचा अर्थ की चोरट्यांनी पूर्ण नियोजन करुन आणि माहिती घेऊन हा स्फोट घडवून आणल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी 26 डिसेंबर 2021 रोजी महाळुंगे चाकण येथील ऍक्सिस बॅंकेचे एटीएम अशाच प्रकारे स्फोट घडवून लुटण्यात आले होते. मात्र यावेळी चोरट्यांनी भर वस्तीत स्फोट घडवून आणल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
“एटीएम’ला सुरक्षा रक्षकच नाही
शहरात एटीएम फोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी बॅंकांना वारंवार सूचना देऊनही बॅंका अजूनही एटीएमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ज्या ठिकाणी एटीएममध्ये स्फोट घडवून आणण्यात आला. त्याच्या समोरील बाजूस चार बॅंकांचे एटीएम सेंटर आहेत. मात्र यापैकी एकाही एटीएमच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक नियुक्त केलेले नाहीत. चिखली पोलिसांनी परिसरातील सर्व बॅंकांना सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याबाबत पत्र दिले आहे.