रिओ-डी-जानिरो : जगावेगळी पर्यटनस्थळे शोधण्यावा ध्यास अनेकांना लागलेला असतो. तेच तेच आयफेल टॉवर किंवा ताज महाल पहाण्यापेक्षा, ज्याप्रमाणे उत्तर अमेरिकेतील कासवांचे बेट अथवा भारतातल्या फुलांच्या पठाराचा (कास-महाराष्ट्र) पर्यटकांनी शोध घेतला, तसेच एक नवे पर्यटनस्थळ शोधण्यात आले आहे.
मात्र, हे ठिकाण थोडेसे धोकादायक आहे, ते तिथे असलेल्या विषारी सापांच्या वावरामुळे. अटलांटीक समुद्रातील ब्राझीलच्या किनारपट्टीपासून दूर साओ पाओलोच्या परिसरात असलेल्या “इल्हा दा क्विमाडा ग्रांडे’ बेटावर प्रत्येक चौरस मीटरमागे एक इतकी सापांची प्रचंड संख्या आहे.
इथे पावला-पावलावर सर्पदंशाची भीती आहे. मानवाच्या जीवास धोका असल्यामुळे सामान्य नागरिक किंवा पर्यटक ह्यापैकी कोणालाच बेटावर जाण्याची परवानगी नसते. इथे जाणे म्हणजे स्वतःच स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. तरिही आता या बेटावर जाण्यासाठी पर्यटक वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहेत, हे विशेष.
इतके भीतीदायक ठिकाण असल्याने अर्थातच इथली लोकसंख्या शून्य आहे. मात्र म्हणतात ना, विचित्र आणि अपरिचित गोष्टींचे आकर्षण माणसाला स्वस्थ बसू देत नाही. अगदी तसेच या बेटाबाबत होत आहे. या 110 एकरच्या छोट्याश्या बेटावर जवळपास 3 ते 4 हजार महाविषारी साप आढळून येतात. गोल्डन लान्सहेड नावाने ओळखले जाणारे हे घोणस जातीचे साप आहेत. शिवाय पिट व्हायपर नावाचे सापही येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात.
सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी हे साप ब्राझीलच्या मुख्य भूभागावर राहत होते. समुद्राची पातळी अचानक वाढल्यामुळे हे साप ह्या बेटावर अडकले. बेट खूप लहान असल्यामुळे भक्ष्याची उपलब्धता खूपच कमी होती. ह्या समस्येवर मात करण्यासाठी सापांच्या शरीरामध्ये काही बदल घडून आले.
या सापांचे विष इतर सापांपेक्षा 10 पटीने जास्त जहाल बनले. तसेच वर्षाचा काही काळ ह्या बेटाला भेट देणाऱ्या विविध स्थलांतरित पक्ष्यांना ह्यांनी भक्ष्य बनवायला सुरुवात केली आणि आता हाच त्यांचा अन्नाचा मुख्य स्रोत आहे. तसेच ह्या सापांना आपले भक्ष्य बनविणारा कोणताही शिकारी प्राणी, पक्षी ह्या बेटावर नसल्यामुळे सापांची संख्या झपाट्याने वाढत गेली.
आता हे बेट ब्राझील नाविक दलाच्या अखत्यारीत येत असल्याने या बेटाला भेट द्यायची इच्छा व्यक्त करणारे पर्यटक नाविक दलाच्य संपर्कात असतात. सद्यपरिस्तिथीमध्ये ह्या बेटावर जाण्यासाठी ब्राझील सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. पर्यटकांना मर्यदितच प्रवेश असणाऱ्या ह्या बेटावर फक्त संशोधकच पाऊल ठेऊ शकतात. त्यांच्या बरोबर एक डॉक्टर असणे अनिवार्य असते.