जेद्दाह (सौदी अरेबिया) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्य-पूर्वेसाठीची शांतता योजना पॅलेस्टाईन लोकांवर अन्यायकारक असल्याचे सांगून अरब लीगने फेटाळून लावल्याच्या काही दिवसानंतर इस्लामिक कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (ओआयसी) नेही काल हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात अमेरिकेला सहकार्य करू नये असे आपल्या सदस्यांना सांगितले.
जेद्दाह येथे झालेल्या संघटनेच्या सदस्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पॅन इस्लामिक संघटनेने आपल्या सर्व सदस्य देशांना शांतता योजना राबविण्यास नकार देण्याची सूचना केली. पॅलेस्टाईन लोकांच्या किमान आकांक्षा आणि कायदेशीर हक्कांची पूर्तता करीत नसल्याने आणि शांतता प्रक्रियेच्या संदर्भातील अटींना विरोध करत असल्याने ही अमेरिका-इस्त्रायली योजना नाकारत असल्याचे “ओआयसी’च्या निवेदनात म्हटले आहे. “ओआयसी’ने भावी पॅलेस्टीनी राज्याची राजधानी म्हणून पूर्व जेरूसलेमला पाठिंबा दर्शविला. त्याशिवाय आपल्या अरब व इस्लामिक भूमिकेवरही जोर दिला.
इस्त्रायलने मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान, जून 1967 पासून पॅलेस्टाईन राज्याच्या भूभागातून, विशेषत: पवित्र शहर अल-कुड्स अल-शरीफ (जेरुसलेम) व इतर अरब प्रांतांचा ताब्यात घेतल्यामुळे ही अशांतता निर्माण झाली आहे. या शहरांवरील ताबा सोडल्यावरच शांतता प्रक्रिया पूर्ण होईल, निवेदनात पुढे असेही म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेची मध्यपूर्वेसाठी शांतता योजना गेल्या आठवड्यात मांडली होती. यानुसार इस्रायलने जेरूसलेमची अविभाजित राजधानी व पॅलेस्टाईनच्या भूमीवरील संलग्नता असलेल्या वसाहती म्हणून त्यांचे नियंत्रण कायम राखावी, असे सुचवण्यात आले होते.