पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पालिकेत दोन तास बसवून ठेवले

पुणे – महापालिका आणि पाटबंधारे विभागातील पाण्याच्या बिलांवरून असलेल्या थकबाकीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महापालिकेने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. मात्र, हे अधिकारी आल्यानंतर या बैठकीचा विसर पडलेले महापालिका अधिकारी दुसऱ्या बैठकीतच बसून राहिल्याने या अधिकाऱ्यांना तब्बल 2 तास ताटकळत रहावे लागले. त्यानंतर पालिकेच्या या कारभाराबाबत संताप व्यक्‍त करून कोणतीही कल्पना न देता या अधिकाऱ्यांनी पालिकेतून साडेपाचच्या सुमारास काढता पाय घेतला.

गेल्या वर्षभरापासून महापालिका आणि पाटबंधारे विभागात पाण्याच्या थकबाकीवरून वाद सुरू आहे. पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे 354 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा केला असून पालिकेच्या मते ही थकबाकी केवळ 52 कोटी आहे. तसेच पालिकेने या बदल्यात सुमारे 86 कोटी पाटबंधारे विभागास दिले आहेत. त्यावरून या दोन्ही विभागांमध्ये पत्रयुद्ध सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आयुक्‍त सौरभ राव यांच्या सूचनेनुसार, मंगळवारी दुपारी चार वाजता ही बैठक बोलविण्यात आली. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पाडूरंग शेलार यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी चारच्या सुमारास महापालिकेत आले होते. अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे ही बैठक होणार होती. मात्र, महापालिकेची मुख्यसभा संपल्यानंतर अचानक रेव्हेन्यू कॉलनीतील नागरिकांनी महापौरांना घेराव घातला, तसेच महापालिकेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांही विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून बैठक घेण्याची मागणी केली. या बैठका जवळपास साडेपाचपर्यंत झाल्या, त्यानंतर लगेच बचत गटांची बैठक झाली. त्यामुळे सहा वाजेपर्यंत पालिकेचे तीनही अतिरिक्‍त आयुक्‍त आणि पाणी पुरवठ्याचे अधिकारी इतर बैठकीत असल्याने पाटबंधारे विभागाचे अधिकारी ताटकळत बसून होते. अखेर त्यांना सव्वापाचच्या सुमारास मुख्यसभा सुरू असल्याचे खोटे कारण देत बैठक होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.