चांडोहमधील “त्या’ कामांची चौकशी सुरू

दोषींवर योग्य ती कारवाई करणार – गटविकास अधिकारी जठार यांचा इशारा

सविंदणे -शिरूर तालुक्‍यातील चांडोह ग्रामपंचायतीमध्ये गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्य यांनी संगनमताने लाखो रुपयांचा मोठा भ्रष्टाचार केल्याची लेखी तक्रार माजी सरपंच केशव कोंडे व ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांच्याकडे नुकतीच केली होती. याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक प्रभातमध्ये आज (सोमवारी) प्रकाशित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.

माजी सरपंच केशव कोंडे व ग्रामस्थांनी आज प्रत्यक्ष शिरूरचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन देत चौकशी करण्याची मागणी केली. बीडीओ जठार यांनी तात्काळ याची दाखल घेत आजच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गायकवाड यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. गायकवाड यांनी लगेचच चांडोहमध्ये दाखल होत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीमध्ये समाविष्ट असणाऱ्या कामांची प्रत्यक्ष चांडोह येथे येऊन पाहणी केली.

चांडोह गावातील विविध कामांत भ्रष्टाचार झाल्या असल्याबाबतच्या लेखी तक्रारीनंतर लगेचच विस्तार अधिकारी यांना याकामी आज तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी अंती यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.
– संदीप जठार, गटविकास अधिकारी,शिरूर.


चांडोह येथील विविध कामांत झालेल्या भ्रष्टाचाराच्या लेखी तक्रारीनंतर शिरूर गटविकास अधिकारी जठार यांनी तात्काळ दखल घेत आजच चौकशी सुरु केल्याने समाधान वाटत आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी याची सविस्तर चौकशी करून यात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
– केशव कोंडे, माजी सरपंच, चांडोह.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)