नवी दिल्ली – युनायटेड जागतिक कुस्ती महासंघाने करोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेत आपल्या नव्या स्पर्धात्मक कार्यक्रमात बदल केला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आता मार्चपासून सुरू होणार आहेत.
करोनामुळे जागतिक कुस्ती महासंघाने यापूर्वीच आपली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा रद्द केली होती. खेळ सुरू करण्याची मान्यता मिळाल्यानंतर तयारीला सुरुवात करणाऱ्या मल्लांसाठी त्यांनी वैयक्तिक विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन केले होते. सर्बियात बेलग्रेड येथे ही स्पर्धा पार पडली.
महासंघाच्या नव्या कार्यक्रमानुसार आता मोसमातील पहिली मानांकन स्पर्धा इटलीत 4 ते 7 मार्च या कालावधीत होणार आहे. त्यानंतर ऑलिम्पिक पात्रतेसाठी आशियातील फेरी 9 ते 11 एप्रिल दरम्यान कझाकिस्तान येथे होईल.
ही स्पर्धा संपली की लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 12 एप्रिलपासून तेथेच वरिष्ठ गटाची आशियाई अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात येईल. ऑलिम्पिक पात्रतेची जागतिक फेरी 6 ते 9 मे दरम्यान बल्गेरिया येथे होईल.