आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र म्हणजे विकासाच्या कोंदणातील हिरा – महापौर जाधव

चऱ्होली – आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र साकारत आहे. त्यामुळे स्थानिक कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच नोकरीच्या अनेक संधीही उपलब्ध होतील. मोशी येथे उभारण्यात येणारे हे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र म्हणजे जणू शहरातील विकासाच्या कोंदणातील हिरा ठरेल, असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी येथे केले.

आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चऱ्होली येथे आयोजित बैठकीत महापौर राहुल जाधव बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, “व्हिजन 20-20′ अंतर्गत भोसरीच्या विकासाचे स्वप्न आमदार लांडगे यांनी पाहिले असून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. हा भाग झपाट्याने विकसित होत असून जवळच भोसरी, चाकण आणि तळवडे औद्योगिक वसाहत आहे.

त्यामुळे या परिसरातील उद्योगांना बाजारपेठ मिळावी, उत्पादित मालाला प्रकल्प सादरीकरणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने आमदार लांडगे यांनी पाठपुरावा केला. मोशी येथील 240 एकर जागेत आशिया खंडातील हे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र साकारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 975 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रदर्शन केंद्राच्या निमित्ताने उद्योग जगताकडून होणाऱ्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळाले, असल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले.

प्रस्तावित असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात पहिल्या टप्प्यात 20.11 हेक्‍टर जागेमध्ये खुले प्रदर्शन केंद्र साकारणार आहे. या कामासाठी 44 कोटी 22 लाख खर्च अपेक्षित आहे. खुल्या प्रदर्शन केंद्राच्या कामासाठी 49 कोटी 64 लाख रुपयांची मूळ निविदा होती. त्याच्या तुलनेत 10.93 टक्के कमी दराची निविदा संमत झाली. त्यानुसार आता हे काम 44 कोटी 22 लाख रुपयात होणार आहे.

प्रदर्शन केंद्राला एकावेळी 44 हजार नागरिक भेट देऊ शकतील, अशी व्यवस्था असणार आहे. प्रदर्शन केंद्राला चारी बाजूंनी जोडणारे 18 मीटर व 15 मीटर रस्ते असतील. सीमा भिंत, आयकॉनिक प्रवेशद्वार असणार आहे. जागेचे सपाटीकरण करून पूर्ण प्रकल्पात साडेचार हजार झाडे लावण्यात येणार आहेत.अग्निशमन, विद्युत, लॅण्डस्केपिंग, स्वच्छतागृह, वॉश बेसिन आदी सुविधा असतील, असेही महापौर यांनी सांगितले.

पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागेत हेलिपॅड, सौरऊर्जा प्रकल्प आणि औद्यागिक संग्रहालय असे तीन प्रकल्पही होणार आहेत. त्यासाठी प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शेकडो उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील, असेही महापौर जाधव म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)