इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारच्या वतीने पाकिस्तानने आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडे वकिली सुरू केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानशी संबंध वाढवले पाहिजेत अशी सूचना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी केली आहे. पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेले इटलीचे विदेश मंत्री लुईगी दी मैओ यांच्याशी केलेल्या चर्चेच्यावेळी त्यांनी ही सूचना केली.
अफगाणिस्तानात स्थिरता आणि शांतता प्रस्थपित व्हावी हे पाकिस्तानच्या हिताचे आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानशी अधिकाधिक जवळीक साधून त्यांना मदत केली पाहिजे अशी अपेक्षा कुरेशी यांनी व्यक्त केली. या अवघड स्थितीत अफगाणि लोकांच्या आपण पाठीशी उभे राहिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात निर्वासितांचे लोंढे बाहेर जात आहेत त्यांना रोखण्याची गरज आहे. त्यासाठी अफगाणिस्तानात प्रवाही वातावरण तयार करणे गरजेचे असून त्यासाठीच आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत महत्वाची आहे असे त्यांनी म्हटले आहे.
या संबंधात पाकिस्तानने अफगाणिस्तानला आत्तापर्यंत काय मदत केली याची माहितीही कुरेशी यांनी इटलीच्या विदेश मंत्र्यांना दिली. अफगाणिस्तानातील विदेशी नागरीकांना तेथून हलवण्याच्या कामी पाकिस्तानने मोठी जबाबदारी उचलली होती हेही त्यांनी इटलीच्या विदेश मंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिले.