पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- गेल्या काही दिवसांपासून शहराध्यक्ष बदलण्याच्या मागणीवरून काॅंग्रेसमधील गटातटाचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेना- ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अविनाश साळवे यांनी “शिवबंधन’ तोडत काॅंग्रेसचा “हात’ धरला आहे.
हा प्रवेश घडवून आणत काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचा पदभार काढण्यासाठी दिल्ली गाठणाऱ्या गटाला जोरदार धक्का दिल्याची चर्चा आहे.
शिवसेनेला अंधारात ठेवत हा पक्ष प्रवेश झाल्याने शहरांतर्गत महाविकास आघाडीतही वादाची शक्यता आहे. साळवे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. साळवे हे येरवडा परिसरातून शिवसेनेच्या तिकिटावर २०१७ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
तर, आता ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या प्रवेशावेळी साळवे यांना पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. यातून पक्षातील अंतर्गत वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
रमेश बागवेंना धक्का?
साळवे यांना पक्षात घेऊन काँग्रेसने माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनाच धक्का देण्याचे काम केले आहे. बागवे हे पुणे कॅन्टोमेन्ट मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसला केवळ कॅन्टोन्मेंटमधून मताधिक्य मिळाले होते. असे असतानाही स्थानिक नेत्यांकडून हे मताधिक्य कमी असल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला होता.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील पराभावाच्या चिंतनासाठी आलेल्या नाना पटोले यांनी मताधिक्य का कमी मिळाले? म्हणून कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांवरच आगपाखड केली.
त्यानंतर अरविंद शिंदे व बागवे यांच्यात संघर्ष सुरू झाला. तर, बागवे समर्थकांनी मुंबई तसेच दिल्लीत जात थेट नेत्यांकडे शहराध्यक्ष बदलाची मागणी केली होती. त्यानंतर आता प्रत्युत्तर म्हणून साळवेंना पक्षात घेऊन शिंदेंनी बागवेंनाच धक्का दिल्याची राजकीय चर्चा आहे.