व्याजाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता
पुणे – बॅंकांच्या कर्जाबरोबरच ठेवीवरील व्याजदरातही घट होत आहे. केंद्र सरकारच्या रोख्यांवरील परतावाही कमी होत आहे. मात्र, अल्पबचतीवरील व्याजदरात फारशी घट झालेली नाही. मात्र, पुढील तिमाहीपासून अल्पबचतीवरील व्याजदरातही घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्याजावर अवलंबून असलेल्या लोकांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.
गेल्या 5 वर्षांपासून एकूणच व्याजदर कमी असावे या दृष्टिकोनातून अर्थमंत्रालय प्रयत्न केरीत आहे. त्यामुळे भांडवलाचा वापर वाढून उत्पादनाची किंमत कमी होण्यास मदत होते. भारतातील व्याजदराचे प्रमाण जागतिक प्रमाणाशी मिळतेजुळते असावे, असा यामागे दृष्टिकोण आहे. गेल्या तिमाहीत केंद्र सरकारने पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी)वरील व्याजदरात बदल केला नव्हता.
सध्या अल्पबचत योजनेमध्ये 12 लाख कोटी रुपये आहेत तर, बॅंकांमध्ये ठेवीच्या स्वरुपात 114 लाख कोटी रुपये आहेत. बॅंकांचे ठेवीवरील व्याजदर कमी होत असताना अल्पबचतीवरील व्याजदर जास्त ठेवणे सुसंगत नाही. यासाठी पुढील तिमाहीपासून अल्पबचतीवरील व्याजदर सरकारी रोख्यांच्या परताव्याशी संलग्न केले जाण्याची शक्यता असल्याचे आर्थिक व्यवहार सचिव अतनु चक्रवर्ती यांनी सूचित केले आहे. गव्हर्नर शामला गोपीनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. त्यानुसार व्याजदर कमी केले जाणार आहे. बॅंकांतील ठेवीच्या व्याजदरापेक्षा अल्पबचतीवरील व्याजदर एक टक्क्यांनी जास्त आहेत. त्यामुळे याबाबत बॅंकांनी सरकारकडे अनेकवेळा तक्रार केली आहे.