सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा

सापडलेले 3 हजार 500 रुपये पोलिसाकडे सुपूर्द

सातारा- येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सापडलेले 3 हजार 500 रुपये सुरक्षा रक्षक वसीम मुलाणी यांनी प्रामाणिकपणे जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत तैनात असणाऱ्या पोलीस नाईक राजेश दिलीप पवार यांच्याकडे सुपूर्त केली. यापूर्वीही एका महिलेची 15 हजार रुपये रोख रक्कम असणारी पर्स गहाळ झाली होती ती याच सुरक्षा रक्षकाला सापडली होती. ती पर्सही त्याने संबंधित महिलेला परत केली होती.

सातारा जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असतात. या ठिकाणी अपघात, विषारी औषध प्राशन, मारहाण, आत्महत्येचा प्रयत्न या रुग्णांसह वेगवेगळ्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी प्रतिदिन हजारो लोकांचा वावर होत असतो. रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईकही सोबत येत असल्याने जिल्हा रुग्णालय हे गर्दीचे ठिकाण बनू लागले आहे. या रुग्णालयात वसीम सलीम मुलाणी (वय 30, रा. परळी, ता. सातारा) हा युवक गेल्या पाच वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहे. मध्यंतरीच्या काळात जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्या पगाराचा मुद्दा उपस्थित झाला होता. 4 ते 5 महिने पगारच होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. ही वस्तुस्थिती असताना येथील सुरक्षा रक्षकांनी मात्र आपला प्रामाणिकपणा, स्वाभिमान जपला आहे, याची प्रचीती देणारी घटना बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात घडली.

वसीम सलीम मुलाणी हा सुरक्षा रक्षक अपघात विभागाच्या बाहेर आपले कर्तव्य बजावत असताना जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये 3 हजार 500 रुपये पडले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. ते पैसे तेथून उचलून त्याने तडक जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकी गाठली. त्या ठिकाणी पोलीस नाईक राजेश दिलीप पवार हे दैनंदिन कामकाज करीत होते. रुग्णालयाच्या आवारात हे पैसे सापडले असून ज्या कोणाचे असतील ते त्यांना परत करा, असे सांगून वसीम मुलाणी याने सापडलेले 3 हजार 500 रुपये राजेश पवार यांच्याकडे सुपूर्त केले. वसीम मुलाणी याच्या प्रामाणिकपणाला जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)