सिमला :– हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. मात्र, भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांची डोकेदुखी बंडखोरांनी वाढवली आहे. त्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसमोरील आव्हानांत बंडखोरीमुळे आणखीच भर पडली आहे.
हिमाचलमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. त्या सर्व जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान होईल. त्यामुळे प्रचारासाठी आता आठवडाभराचाच कालावधी बाकी आहे. सत्ता राखण्याच्या निर्धाराने भाजप आणि सत्ता मिळवण्याच्या निश्चयाने कॉंग्रेस जोरदारपणे प्रचारमोहीम राबवत आहे. पण, त्या पक्षांपुढे खरी चिंता बंडखोरांची आहे.
कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात 11 बंडखोरांनी दंड थोपटले आहेत. तर, भाजपचे 16 बंडखोर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ते बंडखोर निवडणूक निकाल बदलवू शकतात. त्यामुळे बंडखोरांची ताकद निष्प्रभ ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते जोरकसपणे मोर्चेबांधणी करत आहेत. ते प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार ते निकालांतूनच स्पष्ट होईल.
हिमाचलमध्ये अनेक वर्षांपासून कॉंग्रेस आणि भाजपला आलटून-पालटून सत्ता मिळण्याचा ट्रेंड आहे. यावेळी आपच्या एन्ट्रीमुळे हिमाचलची निवडणूक तिरंगी ठरणार का, याविषयी उत्सुकता आहे. त्याशिवाय, भाजप आणि कॉंग्रेसमधील बंडखोरीचा लाभ आपला होणार का, याचेही औत्सुक्य असेल.