आठ विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दप्तर तपासणी
पुणे – राज्यातील आठ विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दप्तर तपासणी डिसेंबरमध्ये झालीच नाही. त्यामुळे विशेष तपासणी पथकामार्फत ती आता 31 जानेवारी अखेर पूर्ण करावी लागणार आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडे नागपूर, अमरावती, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्याकडे पुणे, मुंबई, प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे औरंगाबाद, लातूर, शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रभारी शिक्षण सहसंचालक व्हि.के. खांडके यांच्याकडे तपासणी पथकाच्या प्रमुख पदांची जबाबदारी सोपवली आहे. चारही पथकात प्रत्येकी 8 अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या कालावधीत काही कार्यालयीन अडचणी निर्माण झाल्याने व तपासणी पथकातील अधिकारीही त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे तपासणी होऊ शकली नाही.
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आता तपासणी करण्यासाठी पथकांना मुदतवाढ दिली आहे. तपासणी करण्याबाबतचा आराखडाही शिक्षण आयुक्त कार्यालयानेच निश्चित करून दिलेला आहे. कार्यालयातील मंजूर, कार्यरत, रिक्त पदांचाही तपासणीत समावेश आहे. आस्थापना, लेखा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागांतील 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबरपर्यंतची निकाली प्रकरणे, प्रलंबित प्रकरणांचा तपशील, कार्यालयात विविध विषयांच्या नोंदवह्या आहेत की नाहीत, 60 विषयनिहाय व विभागनिहाय प्रलंबित प्रकरणे, विशाखा समितीचा तपशील यांचीही तपासणी होणार आहे.