अचानक घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये एकच गोंधळ
समजूत काढल्यानंतर संबंधित महिला रुग्णवाहिकेत बसण्यास तयार
येरवडा – दारात रुग्णवाहिका आलेली पाहून एक करोनाबाधित महिला घाबरली आणि रस्त्यावर सैरभैर धावू लागली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलेचे नातेवाईक आणि पोलीससुद्धा गोंधळून गेले. अखेर सगळ्यांनी संबंधित महिलेची समजूत काढल्यानंतर ती रुग्णवाहिकेत बसण्यास तयार झाली. हा प्रकार येरवडा येथील आर. के. चौकात घडला.
या परिसरात दोन करोनाबाधित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांना नेण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत रुग्णवाहिका आली होती. त्यातील एक महिलेने रुग्णवाहिकेमध्ये बसण्यास नकार दिला. त्यामुळे सगळ्यांची पंचाईत झाली. नातेवाईकांनी समजावून संबंधित महिलेला घराबाहेर आणून रुग्णवाहिकेत बसण्यास सांगितले. रुग्णवाहिका पाहून मात्र ती घाबरली आणि परिसरात सैरभैर धावू लागली. रस्त्यावरून सगळीकडे धावधाव सुरू केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
अनेकांनी घराचे दरवाजे बंद केले. अचानक महिला पळू लागल्याने पोलीससुद्धा चक्रावून गेले होते. महिला पुढे आणि नातेवाईक आणि पोलीस तिच्या मागे, असे चित्र दिसत होते. अखेर नातेवाईक व पोलिसांनी या महिलेला पकडले तरीही ती रुग्णवाहिकेत बसण्यास तयार नव्हती. अखेर पोलीस प्रशासनाने तिची समजूत काढण्यास सुरुवात केली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस शिपाई विष्णू सरवदे, नितीन बोराटे, सागर कोतवाल, विनायक साळवे यांनी संबंधित महिलेला “तुमची योग्य काळजी घेऊ’ असे सांगितले. तसेच, नातेवाईकांना धीर देत योग्य ते मार्गदर्शन केले. अखेर महिलेचे मन परिवर्तन झाल्याने तिला रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.