सातारा – करोनाने संपूर्ण देशभरात थैमान घातले आहे. देशात सर्वाधिक रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. यातही जुलैमध्ये मोठी भर पडणार असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. अशातच करोनावरील इंजेक्शन निघाले आहे. पण ते आपल्याला परवडणारे नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते सातार्यातील विश्रामगृहात माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले कि, आता आपल्याला करोनासोबतच जगावे लागणार आहे. आत्मविश्वासाने उभे राहणे, स्वत:ची काळजी घेणे, हाच पर्याय आहे. करोनावर इंजेक्शन निघाले आहे. पण, ते आपल्याला परवडणारे नाही. आपल्या देशात मिळत नाही. 30 ते 35 हजार रुपये आपल्या माणसाला परवडणारे नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
मुंबई-पुण्यातून बाहेर गेलेली लोक पुन्हा येऊ लागली आहेत. त्यामुळे करोना रुग्ण आणखी वाढण्याची भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ज्याला विधानसभेला, लोकसभेला लोकांनी मोठ्या मतांनी नाकारला त्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही असा टोला शरद पवार यांनी गोपीचंद पडळकरांचे नाव न घेता लगावला आहे.