जिल्हा “रोल मॉडेल’ करण्यासाठी खासदारांचा पुढाकार

संतोष पवार
खा. श्रीनिवास पाटील यांचा आमदार, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना पत्रव्यवहार

सातारा  – प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव, राजकीय, सामाजिक क्षेत्रात उमटवलेला ठसा, सिक्‍कीमचे राज्यपालपद या माध्यमातून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या कामाची ओळख निर्माण करण्यात खा. श्रीनिवास पाटील यशस्वी झाले आहेत. आता त्यांनी जिल्हा “रोल मॉडेल’ बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मतदारसंघातील आमदार, माजी आमदार, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्याशी पत्रव्यवहार करून खा. पाटील यांनी त्यांच्याकडून प्रलंबित प्रश्‍नांची माहिती घेतली. लोकसभा अधिवेशनात या प्रश्‍नांवर आवाज उठवून ते मार्गी लावण्याचा निर्धार खा. पाटील यांनी या कृतीतून व्यक्‍त केला आहे.

मारुल हवेली, ता. पाटण यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या श्रीनिवास पाटील यांनी सनदी अधिकारी म्हणून केलेल्या कामाची ओळख देशभर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे शालेय जीवनापासूनचे जिवलग मित्र, ही त्यांची आणखी एक ओळख. ग्रामीण भागातील जनजीवन, लोकांच्या अडीअडचणींची खडान्‌खडा माहिती असणारे रांगडे व्यक्तिमत्व म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख आहे. अनेक भाषांवर प्रभुत्व, शांत, संयमी म्हणून ते परिचित आहेत. त्यांनी विकासकामात राजकारणाचा वास येऊ दिला नाही. लोकांची समस्या दूर झाली पाहिजे, मग ते कोण करतंय, हे बघायची गरज नाही, अशी त्यांची भूमिका आहे. शरद पवार यांच्याबरोबर बरीच वर्षे काम केल्यामुळे पवारांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.

सनदी अधिकारी, खासदारकी, सिक्‍कीमचे राज्यपाल म्हणून त्यांनी तळागाळातील जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. जिल्ह्यातील प्रश्‍नांची जाण असल्याने त्यांनी लोकसभेत पोटतिडकीने प्रश्‍न मांडले आहेत. विकासकामांमध्ये गटतट, पक्षीय भेदभाव न करता सर्वांना विश्‍वासात घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आदर्श आहे. विरोधकांनाही सन्मानाची वागणूक द्या, असे ते नेहमी सांगतात. विरोधकांनी जहाल टीका केली तरी त्या टीकेला शांतपणे उत्तर देऊन त्यांनी विरोधकांनाही आपलेसे केले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रश्‍न मार्गी लागावेत, अशी त्यांची तळमळ आहे. मतदारसंघाचा विस्तार पाहता सर्वच ठिकाणी स्वत: जाणे शक्‍य नसल्याने खा. पाटील यांनी शक्‍कल लढवली आहे. मतदारसंघातील सर्वपक्षीय आमदार, माजी आमदार, माजी खासदार, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांना त्यांच्यावतीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. प्रत्येकाच्या विभागातील केंद्र सरकारशी निगडीत प्रश्‍नांची माहिती त्यांनी मागवली आहे. एखाद्या खासदाराने अशा प्रकारे पहिल्यांदाच प्रश्‍नांची माहिती मागवल्याने सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला आहे.

अनेकांनी ई-मेल, पत्राद्वारे प्रलंबित प्रश्‍नांची माहिती दिली आहे. रेल्वे, पोस्ट, दूरसंचार, रस्ते, पंतप्रधान ग्रामसडक योजना, पंतप्रधान आवास योजनेतील प्रस्ताव, कांदाटी खोऱ्यातील प्रश्‍न आदी प्रलंबित प्रश्‍नांची जंत्रीच खा. पाटील यांच्याकडे जमा झाली आहे. ही माहिती मागवण्याचा त्यांचा हेतू सफल झाल्याचे यातून दिसते. लोकसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात पोटतिकडीने प्रश्‍न मांडून जिल्ह्यासाठी भरीव निधी आणण्याचा खा. पाटील यांचा प्रयत्न आहे. खा. पाटील हे अभ्यासू संसद सदस्य असून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी ते या अधिवेशनातून काय मिळवणार, याची उत्सुकता आहे.

साहेबांबद्दल आदर आणखी वाढला – सागर शिवदास
खा. श्रीनिवास पाटील यांनी पक्षीय विचार न करता सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांची माहिती सर्व लोकप्रतिनिधींकडून घेतली आहे. आतापर्यंत विकासकामांमध्ये अशा प्रकारचा पुढाकार कुणी घेतला नव्हता. साहेबांचा फोन आला, त्यांनी मला भेटायला बोलावले. मी विचार केला, साहेब राष्ट्रवादीचे, मी भाजपचा जिल्हा परिषद सदस्य. मात्र, साहेबांना भेटल्यावर विकासकामात पक्ष डोक्‍यात ठेवायचा नाही, अशी शिकवण त्यांच्याकडून मिळाली. विकासात भेदभाव करणार नाही. केंद्र सरकारशी निगडीत असलेले काम सांगा, ते पूर्ण करू, अशी ग्वाही खा. पाटील यांनी दिल्याने त्यांच्याबद्दल सागर शिवदास यांच्या मनातील आदर आणखी वाढला आहे.

ज्या मातीत वाढलो, त्या मातीचे ऋण फेडण्याची संधी जनतेने दिली आहे. यापूर्वी प्रशासकीय अधिकारी, खासदार, राज्यपाल म्हणून काम करताना जिल्ह्यातील प्रश्‍नांना प्राधान्य दिले आहे. आता जनतेने दुसऱ्यांदा संसदेत पाठवले आहे, त्यामुळे जनतेचे प्रश्‍न सोडवणे, हेच ध्येय आहे. विकास करताना गटतट, पक्षीय भेदभाव नसावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे. समाजकारण करताना राजकारणाचा वास लागू नये, तरच विकासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे, याची जाण ठेवून कार्यरत राहत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्याची ओळख देशभर करणार आहे.

– खा. श्रीनिवास पाटील

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.