शालार्थ प्रणालीतील माहितीच अपडेट होईना

पुणे – राज्यातील शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीत माहिती अद्ययावत करण्याकडे अधिकाऱ्यांरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे उघड झाले आहे. याची गांभीर्याने दखल घेत शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी शिक्षण आयुक्त, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकासह इतर शिक्षणाधिकाऱ्यांची आढावा घेण्यासाठी मंत्रालयात 23 सप्टेंबरला बैठक बोलावली आहे.

सातारा, जालना, ठाणे हे जिल्हे वगळता इतर सर्वत्र जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, अध्यापक विद्यालय यातील शिक्षक, कर्मचारी यांची शालार्थ प्रणालीतील सर्व आवश्‍यक माहिती अपडेट करण्याबाबत 18 जुलै रोजी शासनाने सूचना दिल्या होत्या. सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतून अदा करण्यापूर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार प्रचलित पद्धतीने ते अदा करण्याबाबत देयक प्रणालीमध्ये तयार करण्याच्याही सूचना होत्या. मात्र, त्यानुसार कार्यवाहीच केली नाही. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जून व जुलै या महिन्याची वेतन देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाइन पद्धतीने तयार करण्यासाठी 21 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. या सूचना वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या सर्व अधीक्षकांना देण्याबाबतचे आदेशही उपसचिव चारुशीला चौधरी यांनी काढले आहेत. आढावा बैठक दुपारी 3.30 वाजता अपर मुख्य सचिवांच्या दालनात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)