पडझडीतही कॉंग्रेसकडे उमेदवारांचा ओघ

8 मतदार संघांसाठी 57 इच्छुकांच्या मुलाखती

पुणे – राज्यात कॉंग्रेस पक्षाची पडझड होत असताना पुणे शहरात मंगळवारी झालेल्या मुलाखतीला इच्छुकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आठ विधानसभा मतदार संघातून तब्बल 57 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यात शिवाजीनगर, कसब्यातून इच्छुकांची संख्या जास्त आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने मतदार संघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. सोमवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 11 मतदार संघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात पिंपरी-चिंचवडमधून 10 जणांनी मुलाखती दिल्या. माजी खासदार जयवंतराव आवळे, राष्ट्रीय निरीक्षक राजेश शर्मा, महाराष्ट्र प्रभारी सोनम पटेल, शहराध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिवाजीनगर, कसब्यात चुरस
सर्वाधिक 12 जण हे शिवाजीनगर मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यात माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर दत्ता गायकवाड, खडकी कॅन्टामेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांशिवाय मुकारी अलगुडे आणि इतर माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर, कसब्यातून 11 जणांनी मुलाखती दिल्या. यात नगरसेवक रवींद्र धंगेकर, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी यांचा समावेश आहे. सर्वांत कमी इच्छुकांची संख्या कोथरुड आणि पर्वतीतून आहे. या मतदार संघातून प्रत्येकी तीन इच्छुकांनी अर्ज केले आहेत. कॅन्टोमेंटमधून शहराध्यक्ष रमेश बागवे व त्यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांच्यासह पाच जणांनी उमेदवारी मागितली आहे. हडपसरमधून अभिजीत शिवरकर यांच्यासह पाच जणांनी उमेदवारी मागितली आहे.

यापुढे काय?
आता प्रत्येक मतदार संघातून दोन ते तीन नावे अंतिम होतील. ही नावे प्रदेश कमिटीकडे देण्यात येणार आहेत. दि.6 व 7 ऑगस्ट रोजी केंद्रीय निरीक्षकांसमवेत प्रदेश कार्यकारीणीची बैठक होणार आहे.या बैठकीत उमेदवारांची अंतिम यादी तयार होणार आहे.

सोमवारी जिल्ह्यातील, तर मंगळवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक मतदार संघात इच्छुकांची संख्या अधिक आहे. शहरातील कॉंगेसच्या विद्यामान नगरसेवकांसह आजी- माजी नगरसेवकांनीही मुलाखतीत सहभाग घेतला.

-जयवंतराव आवळे, माजी खासदार, कॉंग्रेस

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)