26 गुन्हे दाखल : 8 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
पुणे – गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कुप्रसिद्ध बंटी-बबली जोडीला जेरबंद केले. ही जोडी घरफोडी करण्यासाठी जात असताना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 26 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
रामा पापा जाधव उर्फ रामा सोनाजी कांबळे (25, रा. शिवाजीनगर व येरवडा) आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. त्यांना 8 जूलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्याकडून 45 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक मोपेड व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे असा अडीच लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
गुन्हे शाखा युनिट एकचे पथक सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेत होते. दरम्यान पोलीस कर्मचारी गजानन सोनुने यांना बंटी-बबली म्हणून कुप्रसिद्ध जोडपे चोरीच्या मोपेड घेऊन घरफोडी करण्यासाठी चालले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतील सोसायट्यांतील बंद घरे फोडल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लष्कर पोलीस ठाण्यातील दोन, भारती विद्यापीठ एक, कोरेगाव पार्क एक आणि ग्रामीणमधील कामशेत टाकवे पोलीस ठाण्यातील एक असे पाच गुन्हे उघडकीस आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी विजेसिंग वसावे, अरविंद चव्हाण, गजानन सोनुने, उमेश काटे, सुभाष पिंगळे, अशोक माने, तुषार माळवदकर, महिला पोलीस पूजा करंजावणे, वैशाली कौरव यांनी केली.
साफसफाई वस्तू विक्रीच्या बहाण्याने रेकी
दोघेही पती-पत्नी अट्टल गुन्हेगार असून बंटी-बबली नावाने घरफोड्या करणारी जोडी म्हणून कुप्रसिद्ध आहे. यापूर्वीही त्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्यावर तब्बल 25 घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी दिवसा साफसफाई करण्यासाठी लागणारे साहित्य, झाडू, पोच्छा घेऊन विक्री करण्याच्या बहाण्याने बंद घरांची रेकी करायचे. यानंतर रात्रीच्या वेळी घराची कुलूप तोडून चोरी करत होते.