नवी दिल्ली – एफआयएच ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी आपल्या मोहिमेची दमदार सुरूवात केली. भारतीय संघाने पहिल्या लढतीत वेल्सचा 5-1 असा धुव्वा उडविला. भारताकडून लालरिंडिकाने दोन, तर लालरेमसियामी, मुमताज खान आणि दीपिकाने प्रत्येकी एक-एक गोल करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.
वेल्सकडून एकमेव गोल मिली होल्मेने 26व्या मिनिटाला नोंदविला. ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकीपटूंनी चांगली सुरुवात केली. सामन्यातील चौथ्याच मिनिटाला लालरेमसियामीने पहिला गोल नोंदवित संघाला आघाडी मिळवून दिली. परंतु ही आघाडी फार काळ टिकली नाही.
वेल्सने सुरुवातीच्या काळात भारतीय बचावफळीचीही चाचणी केली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मिली होल्मेने संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर भारतीय महिला हॉकीपटूंनी सामन्यावर वर्चस्व राखत 5-1 असा विजय मिळविला.