कांगारूच्या देशात : हुश्‍श! जिंकलो एकदाचे

-अमित डोंगरे

भारतीय संघाने अखेर तिसरा एकदिवसीय सामना जिंकत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला विजय नोंदवला. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कॅनबेरातील मनुका ओव्हल मैदानावरील हा एक तपानंतर पहिलाच विजय मिळवला. 

ही मालिका जरी भारतीय संघाने गमावली असली तरीही मानसिक दृष्ट्या हा विजय कोहली आणि कंपनीचे मनोबल वाढवणारा ठरावा हीच अपेक्षा आहे. पहिले दोन सामने व मालिका गमावलेल्या भारतीय संघाचा हा विजय हुश्‍श! जिंकलो एकदाचे, असे व्यक्‍त करण्यासारखाच आहे यात शंका नाही.

ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यापासूनच भारताच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. आयपीएलमध्ये सातत्याने धडाकेबाज कामगिरी करणारे भारतीय फलंदाज एकाएकी निष्प्रभ कसे काय ठरले याचेही कोडे उलगडत नव्हते. मयंक आग्रवाल, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर व सर्वात महत्त्वाचा कर्णधार विराट कोहली यांना अचानक अपयश येत होते व तेच चाहत्यांना खटकत होते.

कोहलीने या तीन सामन्यात दोन अर्धशतके फटकावली असली तरीही ती मध्यमवर्गाच्या चाकरमान्याप्रमाणे. कंपनीचा मालक असल्याच्या थाटात त्याने आक्रमण केले नव्हते. त्यामुळे कोणत्याही मैदानावर, कोणत्याही वातावरणात व कोणत्याही गोलंदाजीचा पालापाचोळा करणारा कोहली कुठेतरी हरवला होता.

अर्थात, अखेरच्या सामन्यात हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांनी कसर भरून काढताना तुफान फलंदाजी केली व ऑस्ट्रेलियासमोर त्रिशतकी धावांचे आव्हान ठेवले. पहिल्या दोन्ही सामन्यात साडेतीनशेचा पल्ला पार केलेल्या ऑस्ट्रेलियाला हे आव्हान पेलवले नाही व त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

आजच्या सामन्यासाठी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत भारतीय संघात नव्या खेळाडूंची वर्णी लागली. त्यात सातत्याने यॉर्कर चेंडू टाकू शकत असलेल्या टी. नटराजनला या सामन्यात पदार्पणाची संधी दिली गेली व त्यानेही या संधीचे सोने केले. त्याने मार्नस लेबुशेन व ऍश्‍टन ऍगर यांना बाद करत पहिल्याच सामन्यात आपली चमक दाखवली.

त्याची शरीरयष्टी पाहिल्यावर हा गोलंदाज ताशी 135 किंवा 140 किलोमीटरच्या वेगाने चेंडू टाकत असेल असे वाटतच नाही. मात्र, जसप्रीत बुमराहचा वारसदार असल्यासारखा तो फसवे चेंडू टाकतो. त्याचे यॉर्कर्स खरोखर अनप्लेयेबल असतात. या सामन्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरचाही समावेश करण्यात आला होता व त्यानेही तीन गडी बाद करत आपल्यावरील विश्‍वास सार्थ ठरवला.

आयपीएल स्पर्धेची उपलब्धी या मालिकेत दिसून आली. हे सर्व खेळाडू आयपीएलचे फाइंड आहेत यात शंका नाही; पण त्यांना संधीही मिळत आहे हे सर्वात महत्त्वाचे. ही एकदिवसीय मालिका जरी भारतीय संघाने गमावली असली तरीही आता येत्या शुक्रवारपासून टी-20 मालिका सुरू होत आहे.

बुधवारच्या सामन्यातील विजय टी-20 मालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. निराशाजनक मानसिकतेतून कोहली आणि कंपनी बाहेर आली असल्याचेच या विजयातून दिसले. खेळाडूंची देहबोली पहिल्या दोन्ही सामन्यात जशी दिसत होती, त्यात कमालीची सुधारणा अखेरच्या सामन्यात दिसली हीच येत्या काळात कांगारूंच्या भूमीत विजयाची मुहूर्तमेढ रोवण्याची नांदी ठरावी हीच काय ती अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.