लंडन – ऍडलेड कसोटीत दारुण पराभूत झालेल्या भारतीय संघाला या मालिकेत काहीही भवितव्य नसल्याचे मत व्यक्त केलेल्या इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने आता भारतीय संघाच्या बाजूने मत व्यक्त केले आहे.
मेलबर्न कसोटीत विजय मिळवल्यावर भारतीय संघाने अत्यंत जिगरबाज खेळाने सिडनी कसोटी अनिर्णित राखली असून आता चौथ्या कसोटीद्वारे भारतीय संघ ही मालिकाही जिंकू शकतो, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
भारतीय संघच्या कामगिरीवर टीका केल्यावर आता वॉनने अचानक भारतीय संघाच्या यशाची खात्री दिली आहे. या मालिकेत भारतीय संघ 4-0 असा पराभूत होणार अशी भाकिते केल्यानंतर आता मात्र, वॉनने भारतीय संघ दुखापतींच्या शुक्लकाष्टानंतरही चौथ्या कसोटीसह ही मालिका जिंकू शकतो, असे वॉन म्हणाला.
भारतीय संघाने गेल्या दोन कसोटी सामन्यात जो खेळ केला तो पाहता त्यांच्या खेळात मोठी प्रगती झाली आहे. आता त्यांना खेळाडूंच्या दुखापतीने संघाला ग्रासले असले तरीही उपलब्ध खेळाडूंमध्ये विजय मिळवून देण्याची निश्चितच क्षमता आहे, असेही वॉन म्हणाला.