गौतम गंभीरने केली प्रशंसा
नवी दिल्ली – इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स याच्यासारखा एक अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात असणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. तसेच वेस्ट इंडिजला एकहाती पराभूत केल्याबद्दल त्याने स्टोक्सचे कौतुकही केले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी गमावल्यानंतरही निराश न होता इंग्लंडने दुसरी कसोटी जिंकली व मालिकेत बरोबरी केली. या विजयात अष्टपैलू स्टोक्सचा मोठा वाटा होता. त्याने वेस्ट इंडिजच्या 11 खेळाडूंवर वर्चस्व राखताना संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याच्यासारखी गुणवत्ता असलेला एकही खेळाडू सध्या भारतीय संघात नाही. येत्या काळात भारताच्या संघात असाच खेळाडू असणे सर्व प्रकारच्या क्रिकेटवर दबदबा राखण्यासाठी महत्त्वाचे आहे, असेही गंभीरने सांगितले.
सध्याच्या सर्व संघांचे निरीक्षण केले तर भारताचा कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांच्यानंतर थेट स्टोक्सचेच नाव घ्यावे लागेल. स्टोक्स एक सामान्य खेळाडू वाटत होता. मात्र, विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडला स्टोक्सच्या रूपाने सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू गवसला, अशा शब्दात गंभीरने स्टोक्सची प्रशंसा केली आहे.