#FIHSeriesFinals : महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारताला विजेतेपद

हिरोशिमा – भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवित आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या एफआयएच करंडक महिलांच्या हॉकी स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात त्यांनी जपानचा 3-1 असा पराभव केला. भारत व जपान हे दोन्ही संघ यंदा आयोजित केल्या जाणाऱ्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

भारताच्या गुरजित कौर हिने दोन गोल नोंदवित महत्त्वाचा वाटा उचलला. मध्यंतराला दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. उत्तरार्धात भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करीत आणखी दोन गोल करीत सामना जिंकला.

जपानसाठी स्थानिक वातावरण व प्रेक्षकांचा पाठिंबा ही जमेची बाजू होती. तथापि सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला राणी रामपाल हिने पेनल्टी कॉर्नरचा लाभ घेत भारताचे खाते उघडले. भारताला या आघाडीचा आनंद फार वेळ घेता आला नाही.

सामन्याच्या 11 व्या मिनिटाला जपानच्या कानन मोरी हिने अप्रतिम गोल केला व 1-1 अशी बरोबरी साधली. तिने भारताच्या दोन खेळाडूंना चकवित हा गोल केला. उत्तरार्धात सामन्याच्या 45 व्या मिनिटाला गुरजितने गोल करीत संघास 2-1 असे आघाडीवर नेले. पुन्हा 60 व्या मिनिटाला तिने आणखी एक गोल केला व संघाची बाजू भक्कम केली. हे दोन्ही गोल तिने पेनल्टी कॉर्नरद्वारा केले.

जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताला जपानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाची परतफेड भारताने येथे केली.

भारताच्या पुरुष संघाने नुकतेच एफआयएच करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते व ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतील प्रवेश निश्‍चित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.