लक्षवेधी: भारतीय वाहन उद्योग मंदीच्या विळख्यात

सुभाषचंद्र सुराणा

भारतीय वाहन उद्योगात सध्या प्रचंड मंदीची लाट आहे. या मंदीमुळे देशातील वाहन उद्योग आर्थिक संकटाच्या विळख्यात गुरफटलेला आहे. या मंदीच्या लाटेमुळे देशभरातील 20-25 लाख कर्मचारीवर्गाच्या नोकऱ्या गेलेल्या असून, त्यांच्यावर बेरोजगारीचा जबरदस्त फटका बसलेला आहे.

देशभरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या बेसुमार वाढत होती. त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था व वाहन उद्योग तेजीत होता. देशातील वाहनांची निर्यात 45 हजार कोटींची आहे आणि देशात सर्वाधिक रोजगार देणारा वाहन उद्योग साडेचार लाख कोटींचा आहे. तोच सध्या आर्थिक मंदीच्या विळख्यात गुरफटलेला आहे. गेल्या वर्षभरापासून या उद्योगात मरगळ असल्याने अनेक कंपन्यांनी वाहनाचे उत्पादन थांबविले आहे. या मंदीच्या लाटेमुळे वाहनाचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांना याचा जबरदस्त फटका बसलेला आहे. या वस्तुस्थितीमुळे या व्यवसायाची संलग्न असलेल्या पूरक उद्योगांतील जवळपास 20 लाख कामगारांना नोकरी गमवावी लागलेली आहे.

हरियाणा, औरंगाबाद, नाशिक, पुणे, चेन्नई, जमशदपूर व उत्तराखंडातील अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. वाहनउद्योगातील या मंदीचे दुष्परिणाम अत्यंत वाईट परिस्थितीने गळ्याला फाशी लागेल इथपर्यंत पोहोचलेली आहे. “बॉश’ सारख्या आघाडीच्या सुटे भाग पुरविणाऱ्या कंपनीला सलग पाच दिवस उद्योग- कामकाज बंद ठेवावे लागत आहे. ही धोक्‍याची घंटा असून ही स्थिती अतिशय चिंताजनक आहे. कार, व्यावसायिक वाहने, दुचाकी आदीच्या उत्पादनासाठी आवश्‍यक असणाऱ्या कंपन्यांना या मंदीची सर्वाधिक झळ बसलेली असून त्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करणे भाग पडत आहे.

वाहनांचे सुटे भाग तयार करण्याच्या उद्योगांत जवळपास 50-60 लाख कामगार काम करतात. जीएसटीमुळे गेल्या एक वर्षापासून विक्रीत 80 टक्‍के घट झाली आहे. वाहन उद्योगाचा भाग असणाऱ्या सर्व उद्योगांवर सारखाच जीएसटी आकारण्याची मागणी ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्‍चरर्स आसोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारकडे केली आहे. या संघटनेचे महासंचालक विन्नी मेहता यांनी या उद्योगक्षेत्रातील मंदीच्या गंभीर परिस्थितीची कल्पना केंद्रीय परिवहन भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनाची विक्री 70 टक्‍क्‍यांनी घटली आहे. या क्षेत्रात काम करणारे 70 टक्‍के कर्मचारी कंत्राटांवर काम करतात. त्यामुळे मंदीच्या परिस्थितीमुळे या कर्मचारी वर्गांना कामावरून कमी करण्यात आले आहे. सुट्या भागांच्या कारखान्यात काम करणारे, वाहनांची ने-आण सेवा देणारे इत्यादीकांचे रोजगार संपुष्टात आले आहेत. देशभरात सुट्टे भाग निर्माण करणाऱ्या कंपन्यांची संख्या सुमारे 50 हजार आहे. या सर्व कंपन्यांची आर्थिक उलाढाल प्रचंड आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा 2.3 टक्‍के हिस्सा आहे.

महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहत ऑटोमोबाइल हब म्हणून ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांच्या दुचकी, चार चाकी वाहनांचे सुटे भागाचे उत्पादन येथे होते. दिल्ली, गुजरात, दक्षिण भारतातील उद्योगांना येथून सुटे भाग पुरविले जाते. सध्या येथील ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये जवळपास दीड ते दोन लाखांच्या आसपास कामगार आहेत. त्या सर्व कर्मचारीवर्गावर बेकारीची भीती निर्माण झाली आहे. स्कोडा, होंडा, टाटा, बीएमडब्ल्यू, व्हॉल्व्हो, मारुती यांना उत्पादनासाठी लागणारे सुटे भाग औरंगाबादमध्ये तयार होतात.

देशांतर्गत व्यावसायिक आणि खासगी कारच्या विक्रीमध्ये जून महिन्यात 25 टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे. कार विक्रीत घट होण्याचा ऑगस्ट हा सलग नववा महिना आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि टोयोटा आदी सर्व प्रमुख कंपन्यांची विक्री 50 टक्‍क्‍याने घटली आहे. मारुती सुझुकीने गेल्या सहा महिन्यांपासून उत्पादन कमी केले आहे.

मारुती कारच्या उत्पादन व विक्रीत एप्रिल ते जून या तिमाहीत या कंपनीचा नफा तब्बल 31 टक्‍के घटून 1 हजार 376 कोटी रुपयांपर्यंत खालावला आहे. बजाच ऑटोच्या नफ्यातही 3 टक्‍के घट झाली आहे. जपानमधील आघाडीची कार उत्पादक कंपनी निस्सानने देखील कामगार कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या भारतातील प्रकल्पांत कार्यरत असणाऱ्या 1 हजार 700 कामगारांना नोकरीतून कमी करण्याची वाटचाल चालू आहे. या कंपनीच्या कार विक्रीत 30 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. या कंपनीचा भारतातील व्यवसायाचा आलेख घसरलेला आहे. निस्सानच्या एकूण नफ्याने 10 वर्षांतील यंदा नीचांक नोंदविला आहे.

वाहन उत्पादक कंपन्यांमध्ये एकेकाळी जगात दबदबा राखणाऱ्या टाटा मोटर्सच्या तोट्यात दुपटीने वाढ झाली आहे. जून अखेरच्या तिमाहीत या कंपनीच्या तोट्याचा आकडा 3 हजार 679 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे या कंपनीच्या वाहनांना चीनमधून कमी मागणीचा फटका बसला आहे. त्यामुळे नॅनोसारख्या कारची विक्री व उत्पादन गेल्या काही महिन्यापासून बंद आहे. वर्षभरापूर्वीच्या याच तिमाही दरम्यान टाटा मोटर्सला 1,862.57 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

मंदीसदृश वाहन उद्योग क्षेत्रात विपणन खर्च व घसघशीत सूट-सवलतीचा फटका देखील सर्व वाहन कंपनींना व सुटे स्पेअर पार्ट बनविणाऱ्या 3 हजार कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. देशातील प्रवाशी वाहनांच्या, बाजारपेठेवर मंदीचे मळभ दाटले जात आहे. गेल्या सहा महिन्यांत अनेक कंपन्यांची दुचाकी, चारचाकी वाहनांच्या विक्रीत घट होत असल्याने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे कार वितरक शोरूम बंद करण्याचा निर्णय झपाट्याने घेत आहेत.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार दोनशे कारची शोरूम बंद झालेली आहेत. 2020 सालापर्यंत भारत जगातील एक महासत्ता म्हणून उदयास येण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरची बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलेले असताना व्यवसायातील मंदी व बेरोजगारीचे संकट दूर झाल्याशिवाय हे स्वप्न व उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही. तेव्हा प्रथम व्यवसायातील मंदी दूर करण्यासाठी सरकारने भगीरथासारखा प्रयत्न केला पाहिजे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.