एकाच दिवसात 5.82 लाख कोटी रुपयाचे नुकासन
लॉक डाऊन वाढ व अमेरिका- चीन तणावाचा परिणाम
बॅंका, धातू, रिऍल्टी, वाहन क्षेत्रावर जास्त परिणाम
मुंबई : केंद्र सरकारने देशातील लॉक डाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही उद्योग सुरू करण्यास सवलती दिल्या आहेत. मात्र त्याबाबत कमालीची संदिग्धता आहे. पुरवठा साखळी खंडित झाल्यामुळे कामकाज वेगाने पूर्वपदावर येण्यात अडथळे निर्माण होत आहेत. याचा परिणाम शेअर बाजार निर्देशांकावर झाला. अमेरिका व चीनदरम्यानचा तणावही याला कारणीभूत ठरला.
सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 5.94 टक्क्यांनी म्हणजे 2,002 अंकांनी कोसळून 31,715 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक नेफ्टी 5.7 टक्क्यानी म्हणजे 566 अंकांनी कोसळून 9,293 अंकांवर बंद झाला. निर्देशांक एवढ्या मोठ्या प्राणात कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे आज एकाच दिवसात 5.82 लाख कोटी रुपयाचे नुकासन झाले.
बॅंका, वाहन, धातू आणि रिऍल्टी क्षेत्राचे आज जास्त नुकसान झाले. या क्षेत्राचे निर्देशांक 6 ते 8 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले. लॉक डाऊनमुळे या तिमाहीत कंपन्यांचा नफा कमी होईल असे गुंतवणूकदारांना वाटते. भारतीय शेअर बाजाराचा अस्थिरता निर्देशांक 28 टक्क्यानी वाढून 44 वर गेला.
बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांकात 6.8 टक्क्यांनी कमी झाला. याबाबत विश्लेषकांनी सांगितले की लॉक डाऊनमुळे सर्व उद्योगांचे आणि ग्राहकांचे कामकाज ठप्प झाल्यामुळे कर्ज वसुलीवर परिणाम होऊन बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता वाढण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा आणि ह्युंदाई या कंपन्यांची एप्रिल महिन्यातील विक्री शून्यावर गेली आहे. त्यामुळे वाहन कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली.
आज झालेल्या जोरदार विक्रीचा छोट्या कंपन्यांच्या शेअरवरही परिणाम झाला. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा मिडकॅप 4.4 टक्क्यांनी कोसळला तर स्मॉल कॅप 3.2 टक्क्यांनी कोसळल्याचे दिसून आले. निफ्टीशी संबंधित 50 पैकी 48 कंपन्यांच्या शेअरच्या भावात आज घट झाली. सरकारी आणि खासगी बॅंकांच्या शेअर्सचे अतोनात नुकसान झाल्यामुळे आज झालेल्या निर्देशांकाच्या पडझडीत बॅंकांचा वाटा निम्मा राहिला.
विक्रीचा जोर इतका इतका होता की, राष्ट्रीय शेअर बाजारातील 1438 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर केवळ 386 कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली.