मुंबई – मागील सात वर्षात देशातील चित्र बदलले आहे. देश धोक्यात येतोय, देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आपण सावध रहायला हवं, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
संविधानाने देशातील सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि समानतेचा हक्क दिला. पण भाजप सरकारच्या काळात लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत. हा धोका लक्षात घेऊन देशाला मोठ्या संघर्ष व बलिदानाने मिळालेले स्वातंत्र्य व संविधान अबाधित राखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागरुक रहावे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तारिक अन्वर यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई, संजय राठोड, आदी उपस्थित होते.