पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी अधिसभेने मंजूर केला. विद्यापीठाचा 481 कोटी जमेचा आणि 551 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प बुधवारी मान्य करण्यात आला. जवळपास 70 कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात 100 कोटींची घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.
विद्यापीठाची वार्षिक अधिसभा कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार व अधिसभा सदस्य उपस्थित होते. गतवर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही नवीन तरतूद न करता 606 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावर्षी नव्या योजना व उपक्रमांची घोषणा करून, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, ही अधिसभा कुलगुरू डॉ. करमळकर यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीतील अंतिम अधिसभा ठरली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत विद्यापीठाचे उत्पन्न 100 कोटींनी कमी झाले, तर तूट वाढली आहे. त्यामुळे नव्याने विकासकामे न करता खर्च कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. सुरू असलेली कामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जाईल. शिष्यवृत्ती, संशोधनासाठीही निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. काही नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्पांसाठीची निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
– राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद
अर्थसंकल्पातील विशेष उपक्रम आणि तरतूद (रुपयांत)
*मराठा साम्राज्य विषय केंद्र : 20 लाख
*विद्यापीठ न्यायाधीकरण विभाग : 20 लाख
*पेलोड डेव्हलपमेंट सेंटर : 25 लाख
*रोहिणी भाटे नृत्य संशोधन प्रकल्प : 10 लाख
*भटक्या विमुक्त जातींचे अभ्यासकेंद्र : 15 लाख
*संग्रहालय विभाग निर्मिती : 25 लाख
विशेष तरतुदी (रुपयांत)
*खाशाबा जाधव क्रीडा संकुल : 2 कोटी
*नवीन शैक्षणिक धोरणासाठी कार्यशाळा : 35 लाख
*मोलेक्युलर डायग्नोस्टिक सेंटर : 20 लाख
*आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण : 90 लाख
*विद्यार्थी सुरक्षा विमा : 40 लाख