पुण्यात बाधित सापडण्याचे प्रमाण साडेपाच टक्‍क्‍यांनी खाली

जिल्ह्यातून करोनाला हद्दपारीच्या प्रयत्नांना काहीसे यश

पुणे – जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात बाधित सापडण्याचे प्रमाण 28.3 टक्‍के होते. मात्र, ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात वेग हळूहळू कमी होत आहे. मागील दोन महिन्यात हे प्रमाण तब्बल साडेपाच टक्‍क्‍यांनी खाली आले असून, आता हे प्रमाण 22.7 टक्‍के आहे. हे प्रमाण दिलासादायक असले तरी समाधान देणारे नाही. जिल्ह्यातून करोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा परिषदेसह आरोग्य विभाग काम करत आहे.

जुन-जुलैमध्ये ग्रामीण भागात करोना संसर्ग वाढू लागला. शहरालगतच्या गावांमधून करोना संपूर्ण जिल्ह्यात पसरल्यानंतर “बाधित आणि मृत्यूचे’ थैमान सुरू झाले. मागील दोन महिन्यांतील ग्रामीणमधील बाधितांच्या वाढत्या प्रमाण पाहिले तर, 18 सप्टेंबरपर्यंत 1 लाख 41 हजार 702 संशयितांची तपासणी झाली. त्यामध्ये 40 हजार 167 बाधित सापडले. त्यावेळी हे प्रमाण 28.3 टक्‍के होते. पंधरा दिवसांत हे प्रमाण केवळ एक टक्‍क्‍यांनी कमी झाले.

मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात बाधित सापडण्याचे प्रमाण हळूहळू कमी होण्यास सुरवात झाली. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत केलेल्या घरटी सर्वेक्षणामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत झाली. पर्यायाने बाधितांचे प्रमाण कमी झाले. 2 ऑक्‍टोबर रोजी बाधित सापडण्याचे प्रमाण 27.4 टक्‍के होते. त्यानंतर पंधरा दिवसांत हे प्रमाण 24.3 होते. तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 3 लाख 386 संशयितांच्या एकूण तपासणीमध्ये 68 हजार 475 बाधित सापडले. हे प्रमाण 22.7 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहे.

दोन महिन्यांतील बाधितांचा घटता आलेख
18 सप्टेंबर ते 16 ऑक्‍टोबरदरम्यान ग्रामीण भागात 1 लाख 21 हजार 591 संशयितांची तपासणी झाली. त्यामध्ये 23 हजार 857 बाधित सापडले. या कालावधीमध्ये हे प्रमाण 19.62 टक्‍के होते. तर 16 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान 37 हजार 93 संशयितांची तपासणी झाली. त्यामध्ये 4 हजार 451 बाधित सापडले. महिन्याभरात हे प्रमाण 12 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.