रोगप्रतिकारक द्राक्षासव

सुजाता टिकेकर 

द्राक्षाचा मौसम जानेवारी ते मार्च दरम्यानं असतो. द्राक्षाचा वेल असतो व तो मांडवावर चढवला जातो. द्राक्षे हिरव्या, काळ्या आणि जांभळ्या रंगाची असतात. द्राक्षांमध्ये लहानमोठ्या अशा अनेक प्रकारच्या जाती असतात. लहान द्राक्षांमध्ये बी नसते. मोठ्या द्राक्षांमध्ये मात्र बी असते.

गुणधर्म : 
द्राक्षे पथ्यकारक, मधुर, पाचक, शीतवीर्य, पौष्टिक, बलकर, कंठ्य, केश्‍य, चक्षुष्य रुचकर, संतोषकारक, परिपक्‍व स्थितीत स्निग्ध, मूत्रगामी, वीर्यवर्धक, शीतल तसेच श्रमहारक आहेत.

द्राक्षामध्ये तरुणपणी व वृद्‌धपणी उत्साह टिकवून ठेवण्याचा गुण आहे. द्राक्षे पौष्टिक असतात. पोटातील दाह कमी करण्यासाठी, गॅसेस कमी करण्यासाठी द्राक्षरसाचे सेवन करावे. मूत्रविकारांमध्ये, मूत्रपिंडाचा दाह होत असताना, तसेच मूतखड्यामध्ये द्राक्षे गुणकारी आहेत.

द्राक्ष तहान, दाह, ज्वर, श्‍वास, रक्‍तपित्त, क्षय, आतड्यांच्या आजारात, स्वरभेद, उलटी, मदात्यय, सूज, कावीळ, वातरक्‍त, व आदमानवायुनाशक आहे. तसेच द्राक्षामुळे पोटातील व रक्‍तातील आम्लता कमी होते. द्राक्षांमध्ये कॅन्सर-निवारक गुण असतात. ती संधिवात, अनियमित आणि त्रासदायक मासिक स्राव आणि रक्‍तप्रदरामध्ये गुणकारी आहेत.

घटक ः
पाणी 85.5 टक्‍के,
प्रोटिन 0.8 टक्‍के,
चरबी 7.1 टक्‍के,
कार्बोदित पदार्थ 10.2 टक्‍के,
कॅल्शियम 0.03 टक्‍के,
फॉस्फरस 0.02, टक्‍के,
लोह 0.04 मि. ग्रॅम,
व्हिटॅमिन “ए’15 मि. ग्रॅम.
व्हिटॅमिन “बी2′ 10 मि. ग्रॅम,
नियासिन0.3 मि. ग्रॅम,
व्हिटॅमिन “सी’ 10 मि.ग्रॅम.

कच्च्या द्राक्षात आम्लाचे प्रमाण बरेच असते; जो जो द्राक्षे पिकतात तो तो त्यातील साखरेचे प्रमाण वाढते. या साखरेपैकी बरीचशी साखर ग्लुकोजच्या स्वरूपात असते. इतर फळांतील शर्करेच्या तुलनेने द्राक्षामध्ये सर्वांत जास्त शर्करा असते. द्राक्षामधील ग्लुकोज स्वरूपात असणारी साखर पूर्वपाचित असते; त्यामुळे शरीरात ती सहजतेने शोषली जाते. द्राक्षांमध्ये लोहाचे प्रमाण अल्प असूनदेखील पांडुरोगात ती उपयुक्‍त असतात.

द्राक्षामध्ये असलेले मेलिक ऍसिड, सायट्रिक टार्टारिक ऍसिडसारखे घटक रक्‍तशुद्धी करतात, तसेच त्यामुळे आतडी आणि मूत्रपिंड यांच्या कार्याला उत्तेजन मिळून त्यांच्या कार्याला वेगही वाढतो.

औषधी उपयोग ः
आजारनिवारणासाठी द्राक्षरस उपयोगी ठरतो. द्राक्षांचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते, मूळव्याधीच्या होणाऱ्या त्रासावर द्राक्षे गुणकारी आहेत, ती पित्तनाशक असून त्यांच्या सेवनाने पोटातील जळजळ थांबते.
अंगात दुर्बलता असेल, अशक्‍तपणा वाटत असेल, वजनात वाढ होत नसेल, त्वचा शुष्क झाली असेल, डोळे थकल्यासारखे वाटत असतील व डोळ्यांची आग होत असेल तर द्राक्षरसाचे सेवन करावे. उष्णता कमी करण्यासाठी, थंडपणासाठी, तसेच रक्‍त शुद्धिसाठी द्राक्ष रसाचे सेवन करावे.

जुलाबाचा त्रास होत असेल तर द्राक्षरसाचे सेवन करावे.कॅन्सर निर्मूलनासाठी द्राक्षकल्पाचा उपचार फार उपयोगी पडतो. कॅन्सरचे निदान झाल्यावर सर्वप्रथम शरीरशुद्धी करून घ्यावी. त्यासाठी दोन-तीन दिवस उपवास करावा. पुष्कळ प्रमाणात पाणी प्यावे. बद्‌धकोष्ठता असेल तर एनिमा घेऊन पोट साफ ठेवावे. द्राक्षकल्पाची सुरुवात ज्या दिवशी करायची असेल त्या दिवशी अगदी सकाळी एक-दोन ग्लास थंड पाणी प्यावे. त्यानंतर अर्ध्या तासाने द्राक्षाचे सेवन करावीत.

साधारणपणे सकाळी आठ वाजता द्राक्षे सेवन करायला सुरूवात करावी आणि रात्री आठपर्यंत सहासात वेळा द्राक्षे खावीत. द्राक्षांमध्ये शरीराला आवश्‍यक असणारे सर्व घटक पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे, द्राक्षकल्पाचा प्रयोग पुष्कळ काळापर्यंत चालू ठेवणे हितावह नाही. द्राक्षाचा रस घ्यायचा असेल तर पहिल्या दिवशी प्रत्येक वेळेस 50-100 मि. लि. याप्रमाणे दिवसातून 6-7 वेळा रस घ्यावा. म्हणजे पहिल्या दिवशी एकूण 400-500 मि.लि. रस घ्यावा. दुसऱ्या दिवशी प्रत्येक वेळेस पहिल्या दिवसाच्या दुप्पट म्हणजे 100 ते 200 मि. लि. इतका रस दिवसातून 6-7 वेळा घ्यावा. म्हणजे एकूण 700 ते 1500 मि.लि. इतका रस घ्यावा. याप्रमाणे प्रत्येक दिवशी रसाचे प्रमाण वाढत जाऊन शेवटी दिवसाकाठी 5 ते 6 लिटर रसापर्यंत पोहचावे. हा प्रयोग प्रथम एक-दोन आठवडे चालू ठेवावा.

अनुकूलता असेल तर हा प्रयोग एक-दोन महिन्यापर्यंत चालू ठेवावा.
या पद्धतीच्या दुसऱ्या टप्प्यात एक ते दोन महिने द्राक्षांशिवाय इतर फळे देखील घ्यावीत. तिसऱ्या टप्प्यात फळांशिवाय पालेभाज्या, पालेभाज्यांचा रस, मोड आलेली धान्ये किंवा कडधान्ये वगैरे कच्चा आहार देखील घ्यावा. सहा महिन्यापर्यंत शिजवलेला आहार घेऊ नये.

सहा महिन्यानंतर या प्रयोगाचा चौथा टप्पा सुरू होतो. त्यामध्ये द्राक्षे कोशिंबीर, फळे तसेच स्वतःच्या पचनशक्‍तीनुसार थोडे शिजवलेले अन्न घ्यावे. प्रयोगाच्या काळात संपूर्ण आराम करावा. अशक्‍तपणा वाटला तरी तो तात्पुरता असतो हे लक्षात ठेवावे. द्राक्षकल्पाचा प्रयोग चालू असताना अनेक व्याधी उपटण्याची शक्‍यता असते त्याची रुग्णाने मानसिक तयारी ठेवावी.

द्राक्षकल्पाच्या काळात जुलाब सुरू झाले तर द्राक्षाच्या रसाचे प्रमाण कमी करावे किंवा एक दोन दिवस उपवास करावा. जुलाब बंद झाले की, परत रस घ्यायला सुरुवात करावी. सर्दी होत असेल तर द्राक्षाचा रस थोडा गरम करून प्राशन करावा. हा प्रयोग मात्र एखाद्या अनुभवी निसर्गोपचार तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार व त्याच्याच मार्गदर्शनाखाली शक्‍यतो निसर्गोपचार केंद्रातच करावा. आजकाल नैसर्गिक चिकित्साकेन्द्रात हजारो रुग्णांवर द्राक्षकल्पाचा यशस्वी प्रयोग करण्यात येत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.