वयोवृद्ध आजींचा उपक्रम ः शाडू मातीचा वापर, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पिंपरी (प्रतिनिधी) – सध्याच्या धावपळीच्या जगात कोणतेही काम यंत्र अथवा संगणकाच्या सहाय्याने करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, अशा काळातही 76 वयाच्या कुंभार आजी कोणत्याही साच्याच्या मदतीशविाय आपल्या हातांनी गणरायांच्या मूर्तींना आकार देत आहेत. येत्या गणेशोत्सवाकरिता शक्य तेवढ्या हॅण्डमेड मूर्ती गणेशभक्तांना उपलब्ध करुन देण्यासाठी या आजी राबताहेत.
सांगवीतील कुंभारवाड्यात आपल्या जुन्या घरात मुले, सुना व नातवंडांसह कुसुमबाई दत्तात्रय कुंभार राहतात. 50 वर्षांपासून त्या गणेशमूर्ती बनवित आहेत.दिवाळीत किल्ल्यावरील चित्रे, बैलपोळ्यासाठी बैल, दहहंडीकरिता हंडी, संक्रांतीला सुगडी , उन्हाळ्यात माठ तयार करणे असा वर्षभराचा त्यांचा भरगच्च कार्यक्रम असतो. सध्या गणेशोत्सवामुळे त्या गणरायांचे रूप साकारण्यात मग्न आहेत.
मूर्तीचे बारकावे, नक्षीकाम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुर्तीच्या चेहऱ्यावरील भाव साकारताना सुमारे एक फुटभर उंचीची गणेशमुर्ती तयार करण्यासाठी कुंभार आजींना दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. शारिरिक व्याधी सांभाळत त्या गणेशमूर्ती घडवत आहेत. गणेशचतुर्थीपर्यंत शक्य तेवढ्या पर्यावरणपूरक शाडुच्या मूर्ती साकारण्यावर त्यांचा भर आहे. सध्या रंगकाम करण्यासाठी त्यांची धावपळ सुरु आहे.
सुरुवातीला पतीसोबत कुसुमबाई या शनिवारवाडा येथे गणेशमूर्तींची विक्री करायच्या. तर खडकीत दिवाळीच्या चित्रांची विक्री करायच्या. शारिरिक व्याधी व पतीच्या निधनानंतर त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता मोठ्या जोमाने आपला व्यवसाय सुरु ठेवला आहे. आता यामध्ये मुले, सुना, नातवंडे यांचादेखील सहभाग आहे. कुसुमबाई कुंभार आजींकडे साच्यात तयार केलेल्या मूर्तीदेखील आहेत; मात्र, हाताने तयार केलेल्या मूर्तींवर त्यांचे विशेष प्रेम आहे.