पिंपरी – शेतकऱ्यांच्या अस्मितेपेक्षाही भारतीय तिरंग्याची अस्मिता मोठी आहे. शेतकऱ्यांविषयी खोटा कळवळा दाखवणारे राजकारणी आणि साहित्यिक खूप आहेत. या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण यांची सांस्कृतिक भूमिका सर्वस्पर्शी होती, असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गुरुवारी (दि. 28) व्यक्त केले.
भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड विभाग) आणि लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या वतीने आयोजित यशवंत-वेणू गौरव सोहळ्यात अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. सबनीस बोलत होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि त्यांच्या पत्नी अनुराधा या दांपत्याला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते यशवंत-वेणू पुरस्कार प्रदान करण्यात आला. रामचंद्र देखणे, अभय शास्त्री, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, रंगनाथ गोडगे-पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते महेश शेळके (यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार), आंतरराष्ट्रीय धावपटू संपदा केंदळे (वेणूताई चव्हाण युवती पुरस्कार), सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे (यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार) यांना विविध पुरस्कार प्रदान केले. अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. रमेश पाचंगे यांचे चौघडा वादन झाले. डॉ. अनू गायकवाड, बाजीराव सातपुते, सुरेश कंक, मुकुंद आवटे, जयवंत भोसले, संगीता झिंजुरके, अरुण गराडे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजन केले.