पुणे – ओळख परेडमध्ये आरोपीला फिर्यादीने ओळखले. मात्र, ओळख परेड वेळेत झाली नाही, या कारणाने न्यायालयाने दरोडा प्रकरणातील तीघांना जामीन दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी जामीन मंजूर केला आहे. त्या आरोपींचे नाव एफआयआरमध्ये नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली.
रसालू आदिवासी, राज आदिवासी, बिरकिस आदिवासी (रा. मध्य प्रदेश) अशी तिघांची नावे आहेत. तीघांनी ऍड. खय्युम नय्युम सय्यद आणि ऍड. आकाश सुधीर चव्हाण यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. शिरवळ भागातील किवकी गावाजवळ जानेवारी 2022 मध्ये ही घटना घडली.
काही लोकानी फिर्यादीला 1 किलो सोन्याचा व्यवहार करायला बोलावले. गाडीतील 8 लाख रोख फिर्यादींना मारहाण करून लंपास केले. या गुन्ह्यात रसालू आदिवासी, राज आदिवासी, बिरकिस आदिवासी यांनी इतर आरोपीस दरोडा टाकण्यास मदत केली व लंपास केलेले रोख रक्कम वाटून घेतल्याचा आरोपावरून राजगड पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयीन कोठडीत असताना तिघांनी जामिनासाठी अर्ज केला होता.