पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून कोणतेही भूमिपूजन अथवा नेत्यांची वाट न पाहता बुधवार पेठ येथील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम सुरू करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८८५ मध्ये या जागेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती,
तसेच महात्मा फुले यांनी स्वत: आयुष्यभर निर्मिकाला देव मानून पूजाअर्चा आणि कर्मकांडाला तीव्र विरोध करत सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्यांच्या या विचारांचा आदर्श पुढे ठेवत भूमिपूजनाचा कार्यक्रम न ठेवता महापालिकेने या कामास थेट सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काही दिवसांपूर्वीच कोणाचीही वाट न पाहता कार्यादेश देऊन काम सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
त्यानुसार हे काम सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. बुधवार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर सुमारे चार गुंठे जागेत हे स्मारक बांधले जाणार असून, त्यासाठी सुमारे सव्वासात कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
काही महिन्यांपूर्वी सुमारे १३ वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या जागेच्या मोबदल्याच्या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही जागा स्मारकासाठी देण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर महापालिकेने मागील वर्षी ही जागा ताब्यात घेतली.
मात्र, त्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या स्मारकाच्या आराखड्याबाबत एकमत होत नसल्याने काम रखडले होते. अखेर आराखड्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर महापालिकेने तत्काळ निविदा मागविल्या.
त्यानंतर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदीची वेळ मागितली होती. मात्र, अचानक महापालिकेने भूमिपूजनाचा कार्यक्रम न घेताच कामाला सुरुवात केली असून, माती परीक्षण आणि इतर कामे सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर स्मारकाचे काम वेगाने पूर्ण केले जाणार आहे.