दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्ल्ड कप सुपर लीग सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या लीग अंतर्गत खेळवण्यात येणारे सामने हे 2023 मध्ये भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पात्रता सामने असतील.
यजमान भारत आणि सुपर लीगमधील अव्वल सात संघ यांना विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळणार आहे. आयर्लंड आणि विश्वविजेते इंग्लंड यांच्यातील सामन्याने या लीगला येत्या 30 जुलैपासून प्रारंभ होत आहे. या अंतर्गत इंग्लंडचा संघ आयर्लंडशी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल.
आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व असलेले 12 देशांचे संघ आणि वर्ल्ड क्रिकेट सुपर लीग 2015-17 चे विजेते नेदरलॅंड्स असे 13 संघ या नव्या सुपर लीगमध्ये खेळतील.