दुबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आर. अश्विन यांना आयसीसीच्या “दशकातील सर्वात्तम खेळाडू’ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर करण्यात आले आहे. “दशकातील सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कारासाठी नामांकित सात खेळांडूमध्ये विराट कोहली आणि अनुभवी ऑफस्निपर आर. अश्विन हे दोन भारतीय खेळाडू आहेत. मागील दहा वर्षांमधील अविश्वसनीय कामगिरीबद्दल विराट कोहलीचा पाचही पुरुष गटात समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या नावांमध्ये या भारतीय जोडीसह जो रुट (इंग्लंड), केन विलियम्सन (न्यूझीलंड), एबी डिव्हीलियर्स (दक्षिण आफ्रिका), स्टिवन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), कुमार संगकारा (श्रीलंका) या खेळाडूंचा समावेश आहे.
आयसीसीने निवड केलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीला पहिले स्थान देण्यात आले आहे, तर भारतीय फिरकीपटू आर. अश्विनला सहावे स्थान देण्यात आले आहे. सातव्या स्थानावर श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकाराच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. संगकाराने 2015मध्ये क्रिकेटला अलविदा केला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अन्य खेळाडूंपैकी या यादीत एबी डिविलियर्सच्या नावाचाही समावेश आहे.
या यादीतील नाव निवडताना 2010 ते 2019 दरम्यानच्या काळातील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करण्यात आला आहे. तसे पाहिले तर याच आधारावर विराटने अन्य खेळाडूंच्या तुलनेत या काळात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने या दशकात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तसेच या काळात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तो अव्वल आहे. विराटची सरासरी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या दशकात 50च्या वर राहिली आहे.
गेल्या दशकात विराट कोहलीने 2090 चौकारांच्या मदतीने 18 हजार 726 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 63 शतकांचा समावेश आहे. विराटला दशकातील पुरुषांच्या कसोटीपटू आणि आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठीही नामांकन देण्यात आले आहे. कोहलीबरोबरच धोनीला आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्डमध्ये दशकात पुरस्कार प्रकारातही स्थान मिळाले आहे.
दशकातील सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू :
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), मिताली राज (भारत), सुझी बेट्स (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज) आणि झूलन गोस्वामी (भारत).
आयसीसी दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू :
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया), मिताली राज (भारत), सुझी बेट्स (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज), सारा टेलर (इंग्लंड).
दशकातील सर्वोत्तम वनडे संघ (पुरुष) :
विराट कोहली (भारत), लसिथ मलिंगा (श्रीलंका), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), रोहित शर्मा (भारत), एमएस धोनी (भारत), कुमार संगकारा (श्रीलंका).
दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ (पुरुष) :
विराट कोहली (भारत), केन विलियम्सन (न्यूझीलंड), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), जेम्स अँडरसन (इंग्लंड), रंगना हेरथ (श्रीलंका), यासिर शाह (पाकिस्तान).
दशकातील सर्वोत्तम टी20 संघ (पुरुष) :
राशिद खान (अफगाणिस्तान), विराट कोहली (भारत), इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका), ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया), लसिथ मलिंगा (श्रीलंका), ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) आणि रोहित शर्मा (भारत).
आयसीसी दशकातील सर्वोत्तम टी20 महिला क्रिकेटपटू :
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), सोफी डिवाईन (न्यूझीलंड), एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया), डिएंड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज), एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया) आणि आन्या श्रुबसोले (इंग्लंड)
आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट ऑफ डिकेड पुरस्कार :
विराट कोहली (भारत), केन विलियम्सन (न्यूझीलंड), ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड), मिस्बाह उल हक (पाकिस्तान), एमएस धोनी (भारत), आन्या श्रुबसोले (इंग्लंड), कॅथरीन ब्रंट (इंग्लंड), महेला जयवर्धने (श्रीलंका) आणि डॅनियल विटोरी (न्यूझीलंड).