अलंकापुरीत घुमू लागले भजन, किर्तनाचे सुर

वैष्णवांनी आळंदी गजबजली : उद्या कार्तिकी एकादशी; लाखो भाविक होतातहेत दाखल

एम. डी. पाखरे

आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदीत शनिवारी (दि. 23) श्रींच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशी हरीनाम गजरात साजरी होणार आहे. त्यामुळे राज्य परिसरातून या सोहळ्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल होत आहेत. बुधवारी (दि. 20) श्री गुरु हैबतरावबाबा यांच्या दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा परंपरेने जयघोषात झाली. तर संजीवन समधी सोहळ्यासाठी भाविकांसह दिंड्या अंलकापुरीत दाखल होत असल्याने अलंकापुरी वैष्णवांनी गजबजली असून राहुट्या, धर्मशाळा, मंदिरे आदी ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिनामाने अलंकापुरी भक्‍तीरसात न्हाऊन निघाली आहे.

आज गुरुवार (दि. 21) माउलींचा वार आणि संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात या दुहेरी योगामुळे पहाटेपासूनच इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर हजारो भाविकांनी पवित्र स्नानासाठी गर्दी केली होती. मात्र, इंद्रायणी नदीत पुरेशा प्रमाणात खळखळत नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्‍त केली. नियोजन आढावा बैठकीत वारी पूर्वी इंद्रायणी नदीत वडिवळे धरणातून पाणी सोडू असे आश्‍वासन पाटबंधारे खात्याच्या नियोजन आढावा बैठकीत ग्वाही दिली होती; परंतु अद्यापर्यंत पाणी इंद्रायणी आलेच नाही, त्यामुळे यंदाच्या वर्षी भरमसाठ पाऊस होऊन देखील इंद्रायणी कोरडीच असे म्हणावे लागेल.

श्री पांडुरंग, श्री संत नामदेवरायांची पालखी तसेच इतर संतांच्या पालख्या हरिनामाचा गजरात बुधवारी सायंकाळी अंलकापुरीत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, माउली मंदिरात नवमीनिमित्त गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमात श्रींना पवमान अभिषेक व दुधारती, भाविकांची महापूजा, महानैवैद्य, विणा मंडपात बाबासाहेब देहूकर यांच्या कीर्तन सेवेनंतर धुपारती व त्यानंतर वासकर महाराज यांची परंपरेने कीर्तनसेवा रुजू झाली. दरम्यान, पोलीस प्रशासन, आळंदी नगरपालिका महसूल, वीज वितरण, वाहतूक विभाग व इतर सर्व शासकीय खाती यांनी आपली तयारी पूर्ण केल्याचा दावा जरी केला असला तरी पोलीस प्रशासन वगळता इतर सर्व खात्यांची कामे ही अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहेत. विजेचा लपंडाव सुरू आहे, तर नागरिक व भाविकांना पाणी वेळेवर मिळत नाही.

  • नगरपालिकेचे आश्‍वासन ठरले फोल!
    आळंदी शहरातील चाकण चौक, प्रदक्षिणा मार्ग, केळगाव रस्ता, वडगाव घेनंद रस्ता, मरकळ रस्ता, जुनी नगर परिषद चौक, देहू फाटा, चऱ्होली खुर्द आदी रस्त्यावरील पदपथावर छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. तर भाविकांसाठी आळंदीतील सर्व पदपथ मोकळे करून देऊ असे आश्‍वासन आळंदी नगरपालिकेने आढावा बैठकीत दिलेले होते; मात्र हे आश्‍वासन “फोल’ ठरले असल्याचे दिसत आहे.
  • एलईडीतून अंधूक प्रकाश
    नुकतेच आळंदी शहरात एलईडीचे दिवे बसवण्यात आले आहेत; परंतु त्याचा लख्ख प्रकाश पडण्याऐवजी अंधुक प्रकाश पडत असल्याने नागरिकांसह भाविक देखील नाराजी व्यक्‍त केली आहे. तर हे एलईडी दिवे अखंड म्हणजेच दिवस-रात्र सुरू आहेत.
  • स्वकाम सेवा मंडळाच्या वतीने भाविकांना खिचडी वाटप तसेच चहापाणी वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर देणगी पावती फाडणे, मंदिर व परिसरात स्वच्छता ठेवणे आदी कामे यात्रा संपेपर्यंत स्वकाम सेवा मंडळाचे सदस्य करणार आहेत.
    – अनिल तापकिर, अध्यक्ष, स्वकाम सेवा मंडळ

Leave A Reply

Your email address will not be published.