हुर्रियत कॉन्फरन्स सरकारशी चर्चा करण्यास तयार राज्यपालांचा दावा

काश्‍मीर खोऱ्यातील स्थितीत लक्षणीय सुधारणा

श्रीनगर -मागील वर्षभरात काश्‍मीर खोऱ्यातील स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. हुर्रियत कॉन्फरन्स ही विभाजनवादी संघटनाही केंद्र सरकारशी चर्चा करण्यास राजी झाली आहे, असा दावा जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शनिवारी केला.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये मी राज्यपाल म्हणून जम्मू-काश्‍मीरमध्ये आलो. मी सुत्रे स्वीकारल्यापासून काश्‍मीरमधील स्थितीत सुधारणा झाली आहे. प्रत्येकात बदल झाला आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान 2016 मध्ये हुर्रियतच्या दारात उभे राहिले. मात्र, ती संघटना चर्चेसाठी तयार नव्हती. आज ती संघटना चर्चेसाठी तयार झाली आहे, असे मलिक येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. दहशतवाद्यांची भरती जवळपास बंद झाली आहे.

शुक्रवारी घडणाऱ्या दगडफेकीच्या घटना थांबल्या आहेत. दहशतवादाच्या मार्गावर गेलेला तरूण मारला गेल्यास आम्हाला चांगले वाटत नाही. भरकटलेल्या तरूणांना मुख्य प्रवाहात परत आणण्याची आमची इच्छा आहे. मात्र, कुणी गोळीबार केल्यास सुरक्षा दले त्याला प्रत्युत्तर देणारच. ते काही पुष्पगुच्छ देणार नाहीत, अशी परखड भूमिकाही त्यांनी मांडली.

मी जम्मू-काश्‍मीरमध्ये आलो तेव्हाच केवळ गुप्तचर विभागाचे म्हणणे ऐकायचे नाही असा निर्णय घेतला. मी सुमारे 200 लोकांच्या संपर्कात आहे. त्यांच्याकडून मला समस्या समजतात, असे मलिक यांनी पुढे बोलताना नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.