अमृतकण : घर एक मंदिर

-अरूण गोखले

पायाशी आशीर्वादाला झुकलेल्या नातू आणि नातसुनेस पाहून राधाबाई म्हणाल्या, “”हो माहीत आहे मला, आज नातसुनेच्या रूपाने एक नवी गृहलक्ष्मी आली आहे आपल्या या मंदिरात.”

तेव्हा नातू म्हणाला, “”अगं आजी! हे आपलं घर आहे मंदिर नाही”. तेव्हा त्यांना समजावीत त्या म्हणाल्या, “”बाळांनो! घर हे फक्‍त घर नसतं. तर ते मंदिर असतं. त्या घरातला कर्ता पुरूष हा नारायण आणि त्याची धर्मपत्नी ही लक्ष्मी असते. घरातले आईवडील ही मुलांची दैवत असतात. लहान मुलं ही गोपालकृष्ण तर मुली ह्या देवता”.

घराच्या मंदिराचं पावित्र्य, त्याचं मांगल्य टिकवायचं असतं ते प्रत्येकांनी. इथे प्रत्येकानेच ज्याचा त्याचा उचित मान राखायचा असतो. भावभावना जपायच्या असतात. हवं नको पाहायचं असतं आणि सर्वांनीच ह्या मंदिरात आनंदाने आणि सलोख्याने राहायचे असते.

खरंच घर हे घर नाही तर ते एक मंदिर आहे. नव्हे ते तसं असायला हवं हा विचार किती चांगला आणि अनुकरणीय आहे, नाही का? कारण ज्या घराच्या अंगणात तुळस आहे, उंबरठ्यावर रांगोळी आहे, जे घर स्वच्छ, सुंदर आणि पवित्र आहे, ज्या घरातल्या मातापित्याची देवता मानून पूजा केली जाते, सेवा केली जाते, ज्या घरातल्या गृहलक्ष्मीस उचित मान-सन्मान आहे, तिचा आदर आहे, जिथे दुडदुडती पावलं आहेत त्याला घर न म्हणता मंदिरच म्हटले तर ते जास्त योग्य ठरणार, नाही का? आधी चुकला पण नंतर सुधारला. त्या पुंडलिकाने आपल्या वृद्ध मातापित्याची, त्यांना देव मानून सेवा केली. घराचं मंदिर केलं म्हणूनच ना तो देव त्यास दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष त्याच्या घरी आला. त्याच्या विनंतीस मान देऊन त्याच्या दारी विटेवर कटी कर ठेवून उभा राहिला.

घर म्हणजे केवळ दगडा-मातीची वास्तू नसते. ते एक परस्परातील विश्‍वासावर उभं राहिलेलं मंदिर असतं. त्यातल्या भावनिक भक्‍तीचा फुलोरा हा ज्याने त्याने फुलवायचा असतो आणि घराचे मंदिरपण हे टिकवायचं असतं. हे इतरांनी कोणी करायचे नसते तर ते करायचे असते तुम्ही, आम्ही, आपण सर्वांनी. आपल्या घराची धर्मशाळा न होता ते एक सुंदर मंदिर कसं बनेल ह्यासाठी प्रत्येकानेच प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. “केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’, हे विसरून चालणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.