सातारा -सातारा तालुक्यातील जिहे गाव ऐकाच दिवसात निष्पन्न झालेल्या तब्बल 19 बाधित रुग्णांमुळे करोनाचा नवा हॉटस्पॉट बनले आहे. जिहे गावात वरच्या आणि खालच्या आळीचा बहुतांश भाग सील करण्यात आला. मुंबईवरून एक महिन्यांपूर्वी एक गावाकडचे कुटुंव वास्तव्यास आले आणि संक्रमणाला सुरवात झाली. याच कुटुंबांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये याचा फैलाव झाल्याने एकाच भावकीतील 19 जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
तत्पूर्वी गावातील सात आणि आताचे 19 अशा 26 रुग्णांमुळे सातारा व चिंचणेर वंदन येथील आरोग्य केंद्राच्या पथकांना गावात धाव घ्यावी लागली. अंगणवाडी ताई व सेविकांच्या मदतीने तातडीने गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले. बहुतांश रुग्णांना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. तर काही रुग्ण पानमळेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आल्याचे डॉ. शशांक पाटील यांनी सांगितले. साताऱ्यातील रविवार पेठेतील मृत भाजी विक्रेता भाजीपाला घेऊन जिहे येथे जात असे. हा भाजीपाला येथीलच एक किरकोळ विक्रेता विकत घेऊन तो गावात भाजी विकत असे. हे दोघेही बाधित निघाल्याने त्यांच्या संपर्कातील सहा जणांना त्याची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मात्र, चिंचणेर वंदनच्या आरोग्य पथकाने गावात परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. बाधित रुग्णांना गोळ्या व नियमित औषधोपचार सुरू असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक पाटील यांनी सांगितले. जिहे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने संबधित रुग्णांच्या निवासस्थानांचा परिसर मर्यादित क्षेत्रात कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. श्रीनाथ कॉलनी फलटण रोड हा भाग वर्ये गावाच्या हद्दीत आणि कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येतो. येथील 20 वर्षीय युवकाला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. हा युवक रशियावरून परतल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. संबधित युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. संबधित युवकाच्या घराचे क्षेत्र कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.