शिवसेना नगरसेवक प्रमोद भानगिरे यांचा पुढाकार
पुणे : शहरात करोनाग्रस्तांचा आकडा मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रभागातील रूग्णांना उपचासाठी बेड मिळत नसल्याने शिवसेना नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी आपले कोंढवा येथील 40 खोल्यांचे हॉटेल करोना रूग्णांवर उपचारासाठी देण्यात येणार आहे. त्यात, सुमारे 100 बेडची सुविधा केली असून त्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर तसेच इतर वैद्यकीय स्टाफही ते स्वत: उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठीचे पत्र भानगिरे यांनी प्रशासनास दिले आहे. दरम्यान, भानगिरे यांनाही करोनाची लागण झाली होती, करोनावर यशस्वी मात करून भानगिरे पुन्हा लोकांच्या मदतीसाठी मैदानात उतरले असून आता त्यांनी आपले हॉटेलच रूग्णांसाठी देत आणखी एक आदर्श घालून दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने या केंद्राचे लोकार्पण करण्यात असल्याचे भानगिरे यांनी स्पष्ट केले.
शहरात करोनाच्या साथीचा प्रसार झाल्यानंतर भानगिरे यांनीही आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी मागील तीन महिने अविरतपणे अन्नधान्य, करोनापासून बचावासाठी नागरीक, सोसायटया तसेच खासगी डॉक्टरांना पीपीई कीट वाटप अशा वेगवेगळया माध्यमातून मदत केली. या मदतीदरम्यान, 15 दिवसांपूर्वी भानगिरे यांनाही करोनाची बाधा झाली. त्यानंतर, या आजारावर मात करून ते पुन्हा प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसात शहरात बेड मिळत नसल्याने अनेकांना जीव गमावावे लागत आहेत, अशा स्थितीत गरजू रूग्णांना उपचारासाठी सुविधा मिळावी या उद्देशाने भानगिरे यांनी आता आपले 40 खोल्यांचे हॉटेलच प्रशासनास रूग्ण ठेवण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात, सध्या 40 बेड असून ही संख्या 100 बेडची करण्यात येणार आहे. विशेषत: प्रभाग 26 मंहमदवाडी- कौसरबाग मधील ज्या रूग्णांना घरी विलगीकरणाची सोय नाही अशा रूग्णांना महापालिकेच्या नियमानुसार, या ठिकाणी उपचारासाठी ठेवले जाणार आहे.