मंचर – आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या सुमारास हॉटेल बंद करण्यास सांगितल्याचा राग येऊन हॉटेलमालक व त्याच्या सहकाऱ्याने पोलीस उपनिरीक्षक व पोलीस जवानास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे घडली.
सचिन शिवाजी इंदोरे व प्रमोद इंदोरे (दोघेही रा. चांडोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील सचिन हा पेठ येथे हॉटेल हेरिटेज हे हॉटेल चालवतो. पोलीस जवान सुदर्शन माताडे यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व हॉटेल, ढाबे पान टपऱ्या रात्री दहा वाजण्याच्या आत बंद करण्याचे आदेश आहेत.
त्यानुसार पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, जवान सुदर्शन माताडे, होमगार्ड राजेश कुंभार, आदेश धुमाळ पुणे-नाशिक रस्त्याने गस्त घालत होते. पेठ गावाच्या हद्दीतील हेरिटेज हॉटेल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडे असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी पोलिसांनी सायरन वाजवून तसेच सरकारी वाहनातील अनाउंसीग सिस्टीमने हॉटेल बंद करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळभ हॉटेल हेरीटेजचे मालक पोलिसांच्या गाडी जवळ येऊन म्हणाले हॉटेल बंद करणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. तसेच मी तुमच्याबरोबर येणार नाही. असे म्हणून चालक सचिन इंदोरे यांनी हॉटेलच्या काऊंटरवरील व्यक्तिला बोलावून घेतले.
त्या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावर तुम्ही शिवीगाळ करू नका, पोलीस ठाण्यात चला, असे म्हणताच सचिन इंदोरे याने पोलीस जवान सुदर्शन माताडे यांच्या शर्टाची कॉलर पकडून शर्ट फाडून शिवीगाळ दमदाटी केली. दुसऱ्याने उपनिरिक्षक अर्जुन शिंदे यांना ढकलून देऊन त्या ठिकाणावरुन पळून गेला.
याबाबत पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना माहिती दिली असता ते पोलीस जवान व्ही. बी. गायकवाड, एस. आर. मांडवे, ए. के. पिंगळे यांच्यासह याठिकाणी आले. या दोघांनाही यावेळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले करीत आहेत.