लॉकडाऊमध्ये पार्सल सेवेला ग्राहकांकडून प्रतिसाद कमीच
पुणे – लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद आहेत. सर्वाधिक आर्थिक फटका बसलेल्या व्यवसायात हॉटेल व्यवसाय पहिल्या क्रमांकावर आहे. डामडौल जास्त, भांडवली खर्च जास्त असल्याने तसेच आरोग्याशी निगडित असल्याने ग्राहकांच्या विश्वासावर चालणाऱ्या या व्यवसायाची चव गेल्या दोन महिन्यांत पार गेल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक आर्थिक फटका बसणाऱ्या व्यवसायांत हॉटेल व्यवसायाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. लॉकडाऊन लवकरच संपेल या आशेने काही मालकांनी वेटर, कुक असा मोठा स्टाफ गेली महिनाभर सांभाळला. परंतु, हॉटेल सुरू झाली नसल्याने खर्चाचा मेळ बसत नसल्याने अनेकांनी हॉटेल स्टाफला घरी जाण्यास सांगितले आहे. हॉटेलचा डामडौल राखताना उत्पन्नाची बाजू कोरी असल्याने भट्टी पेटवण्यास अद्यापही हे व्यावसायिक तयार नाहीत.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी पार्सल सेवा सुरू करण्यास काही ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. काही हॉटेल व्यावसायिक पार्सल सेवा देण्याचा विचार करीत आहेत. मात्र, सध्याच्या काळात भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. पंजाबी, चायनीज डिशसाठी लागणाऱ्या बीन्स, गाजर, सिमला मिरची बाजारात मिळत नाहीत. त्यामुळे पार्सलला परवानगी मिळाल्यानंतर हॉटेल व्यवसायला दिलासा मिळेल, हा अंदाज साफ खोटा ठरला आहे.
करोनावर लस, औषध येत नाही, तोपर्यंत हॉटेल व्यवसाय सुरळीत होणार नाही. ग्राहकांच्या मनात स्वच्छतेचा विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी हॉटेलचे सॅनिटायझेशन, फ्युमिगेशन, कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी आदी खर्च वाढणार आहे. पुढील वर्षभर तरी हॉटेल व्यवसायापुढे अडचणी असतील. सरकारने सुरक्षित वावराचे नियम पाळून हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी.
– गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरन्ट अँड हॉटेलियर्स असोसिएशन