पवनाथडी जत्रा : एका बाजूला गर्दीत न जाण्याचे आवाहन, तर दुसरीकडे पवनाथडीचे निमंत्रण
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी 2020 जत्रा उत्साहात सुरु आहे. या जत्रेवर जागतिक आजार ठरलेल्या “करोना’चे संकट असले तरी पवनाथडीमध्ये शेवटच्या दिवशी गर्दीचा नवा उच्चांक रचला गेला. महापौर एका बाजूला गर्दीत न जाण्याचे आवाहन करतात. तर दुसऱ्या पवनाथडीचे निमंत्रण देत आहेत. सगळाच उलट सुलट कारभार अन् आवाहनाची चर्चा पवनाथडीमध्ये ऐकावयास मिळाली. रविवार पवनाथडीचा शेवटचा दिवस होता. सलग सुट्ट्यांमुळे शहरवासियांनीही या यात्रेला भेट दिल्याने शेवटच्या दिवशी आजपर्यंतचे गर्दीचे सर्व उच्चांक मोडले गेले.
महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पीडबल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा भरविण्यात आली आहे. या जत्रेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असून जत्रेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र वैद्यकीय विभाग आणि महापौरांच्या वतीने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. करोना विषाणूने चीनमध्ये धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे हजारो लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. तर भारतामध्येही त्या विषाणूचा शिरकाव झाला असून ठिकठिकाणी संशयित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वैद्यकिय विभागाकडून नागरिकांना दिलासा दिला जात आहे, तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. सर्दी, खोकला, ताप आला असेल तर घरामधून बाहेर पडू नये. तसेच बाहेर गेल्यावर तोंडावर रुमाल बांधावा असे सांगण्यात आले आहे. करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या जवळ गेल्यावर त्या विषाणूची लागण दुसऱ्या माणसाला ही होते. त्यामुळे वैद्यकीय विभागाकडून एकत्र न येत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास सांगितले आहे.
गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे महापालिकेकडून नागरिकांना पवनाथडी जत्रेसाठी येण्याचा आग्रह केला जात आहे. येथे नागरिकांच्या मनोरंजनासाठी महापालिकेने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. तसेच शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे स्टॉल्स याठिकाणी उभारले आहे. त्याचा जास्तीजास्त लाभ घेण्यासाठी नागरिकांना पवनाथडी जत्रेत येण्याचे आवाहन केले जात आहे. अत्यंत विरोधाभास निर्माण करणारे आणि उलट-सुलट आवाहने पालिकेकडून सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अनेक बचतगटांची नोंदणी करून त्यांना स्टॉल्स देण्यात आले होते. त्यामुळे जत्रा रद्द करणे शक्य नव्हते. मात्र कमीत कमी गर्दी करण्याचे आवाहन तरी महापालिकेकडून शक्य होते. तसेच या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असताना त्याकडे मात्र दूर्लक्ष करण्यात आले. करोना विषाणूपासून वाचण्यासाठी गर्दीत न जाण्याचे आवाहन केले जात असतानाच महापालिकेकडून मात्र जत्रेसाठी एकत्र येण्याचा आग्रह केला जात असल्याचा विरोधाभास यानिमित्ताने समोर आला.
आज (रविवार) पवनाथडी जत्रेचा शेवटचा दिवस आहे. नागरिकही सांभाळूनच आहेत. जास्त गर्दीही होत नाही, त्यामुळे जास्त काळजीचे कारण नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणीच नागरिक खुर्च्यांवर जवळ बसतात. तसे इतरत्र फिरत असताना ते जास्त जवळ येत नाही. महापालिकेकडूनही काळजी घेण्यात येत आहे.
– माई ढोरे, महापौर, पिं.चिं.महापालिका